मुंबई : जगातील विविध ठिकाणी असणारी चित्रपटसृष्टी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं ही माफक अपेक्षा असते. कारण, अखेर प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच या कलाकार मंडळींच्या यशाची समीकरणं आधारित असतात. मुळात प्रेक्षकांची पसंती मिळण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणंही तितकंच महत्त्वाचं. हाच मुद्दा हेरत मराठमोळ्या बाहुबलीने एक सुरेख संकल्पना सर्वांपुढे आणली आहे.
हा मराठमोळा बाहुबली म्हणजे अभिनेता शरद केळकर. बाहुबली या चित्रपटत मुख्य पात्राला आपला आवाज देणाऱ्या शरद केळकरने नुकतीच सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिव्हलला भेट दिली. यामध्ये त्याने काही अनोखे क्षण अनुभवले. त्यातीलच एक म्हणजे कंटेनरमधील सिनेमागृह.
दूरदेशीच्या गावांमध्ये ज्या ठिकाणी मल्टीप्लेक्सना फारसा वाव नाही, पण सिनेमाप्रेमींमध्ये या कलेचे अप्रतिम नजराणे पाहण्याची उत्सुकता मात्र आहे अशा ठिकाणांमध्ये हे कंटेनरमधील सिनेमागृह म्हणजे एक उत्तम पर्याय. एका कंटेनरमध्ये सिनेमागृह असणं आणि त्यात शंभर माणसं बसू शकतील अशी व्यवस्था असणं यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रीया अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली.
पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल
देवगडच्या कंटेनर थिएटरमध्ये सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात झाली. 'एसएनएफएफ'सारखे महोत्सव व्हायला पाहिजेच अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. गावागावात असे कंटेनर थिएटर सुरु झाले तर, सिनेमा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. तेव्हा आता त्याचा हा विश्वास पाहता अशा थिएटरच्या निर्मितीसाठी कोणती पावलं उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.