सत्य घटनेवरील ‘टेक केअर गुड नाईट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सायबर क्राईमवर भाष्य करणारा सिनेमा...

Updated: Aug 11, 2018, 12:13 PM IST
सत्य घटनेवरील ‘टेक केअर गुड नाईट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी सिनेमा ‘टेक केअर गुड नाईट’ याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे सिनेमातील या कलाकारांच्या उपस्थितीत हा ट्रेलर प्रदर्शन सोहळा पार पडला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा ३१ ऑगस्ट २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

असा आहे सिनेमा

या सिनेमाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडले आहेत.

असा झाला या संकल्पनेचा जन्म

लेखक गिरीश जोशी म्हणतात की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी फोन केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाईल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले.''

आणि सिनेमा आकाराला आला

जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राईमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि सिनेमाला लय मिळत गेली. जेव्हा मी सिनेमाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा ठरला.”