मुंबई : वृत्तनिवेदकाच्या वेगवेगळ्या शैलीचे प्रहसन करणारी, आणि न्यूज चॅनल वर दिल्या जाण्याऱ्या बातम्यांचे व्यंग करत विनोद निर्मिती करणारी 'नो ब्रेकिंग न्यूज' ही वेब मालिका "व्हायरस मराठी"वर सुरू झाली आहे. अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे ही "व्हायरस मराठी" या प्रसिद्ध युट्युब चॅनेलवरील 'नो ब्रेकिंग न्यूज' या नव्या शो मध्ये वृत्तनिवेदिकेची भूमिका करत आहेत.
सादरीकरणाची पद्धत आणि त्यातला तोच तोचपणा याला कंटाळून चक्क बातम्या देताना तांदूळ निवडण्याचे काम शर्मिला राजाराम यांनी केले. कंटाळवाण्या बातम्यांमध्ये रंग भरण्यासाठी शर्मिलाने चक्क तांदूळ निवडत बातम्या दिल्या आहेत.
हा शो आणि तिची वृत्तनिवेदनाची पद्धत प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी आणि न्यूज विश्वात ज्या पद्धत्तीने बातम्या दिल्या जातात,त्या बातम्यांचे विषय या सगळ्यावर विनोदी पद्धतीने ही मालिका भाष्य करते. निवेदनाच्या आणि सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे या मालिकेला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
शर्मिलाने या आधी व्हायरस मराठी सोबत संतोष कोल्हे दिग्दर्शित 'शॉक कथा' या मालिकेसाठी काम केले असून ते ही मालिका सुद्धा प्रचंड गाजली होती.
व्हायरस मराठीच्या या वेब शो चे लेखन, युगंधर देशपांडे यांनी केले असून दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. "नो ब्रेकिंग न्यूज" चे आतापर्यंत २ एपिसोड व्हायरस मराठीवर प्रदर्शित झालेले असून त्याचा तिसरा एपिसोड शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ट्रेलरवरून या भागात काय घडणार आहे याची किंचित कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल. लॉकडाऊनच्या काळात सगळे वर्क फ्रॉम होम करत असून, जर वृत्तनिवेदक वर्क फ्रॉम होम करू लागले तर ते कशाप्रकारे बातम्या देतील, हे या शो मध्ये विनोदी पद्धतीने दाखवले गेले आहे.