'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न

Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...

दिक्षा पाटील | Updated: May 27, 2024, 02:00 PM IST
'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न title=
(Photo Credit : Social Media)

Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांचा अभिनय तर कधी सोशल मीडिया पोस्ट. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळीनं त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मिलिंदनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद आणि त्याची पत्नी दीपाचे काही फोटो आहेत. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंदनं कॅप्शन दिलं की 'एका डोंबाऱ्या बरोबर 34 वर्ष संसार सुरू आहे. आज आमच्या लग्नाला 34 वर्ष पूर्ण झाली. माझ्या बहिणीनं शेगावच्या गजानन महाराजांकडे नवस बोलला होता, माझा भाऊ मिलू जर दहावी पास झाला तर मी त्याला शेगावला दर्शनाला घेऊन येईन आणि कदाचित शेगावच्या गजानन महाराजांमुळे मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 47 टक्के मार्काने उत्तीर्ण झालो, अकरावीला गेलो, आई म्हणाली की जळगावला देशमुखांच्या घरचं लग्न आहे, ते लग्नला उपस्थिती दाखवून, आपण मिलूचा नवस फेडायला शेगावला जाऊया. मी म्हणालो मला नाही यायचं जळगाव बीळगाव ला, आई म्हणाली नवस आहे तो तर फेडावाच लागतो, पहाटे आमची एसटी जळगावला पोहोचली, लग्न घरी पोहोचलो आणि समोर एक अतिशय सुंदर मुलगी मला दिसली, आईला म्हटलं की ती लांब केसांची लाल ड्रेस मधलीजी मुलगी आहे, तिच्याशी मला लग्न करायचं. आयुष्यभर आईने माझे हट्ट पुरवले, तसाच हा सुद्धा हट्ट तिनं पुरवला. आईनं लगेच तिच्या घरच्यांना सांगितलं मला ही मुलगी सून म्हणून पसंत आहे. मुलांचं लग्नाचं वय झालं की आपण या दोघांच्या लग्नाचा विचार करूया."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : कायच्या काय सुंदर! मौनीच्या बिकीनी लूकनं वाढवलं तापमान...

पुढे मिलिंद गवळी म्हणाली, "माझे आई-वडील दोघेही अतीशय प्रेमळ, आणि हे सगळ्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांना खात्री होती आपली दिपूली त्या घरात सुखात राहील, आणि मुलगा मोठा झाल्यावर काय ना काहीतरी काम धंदा करेलच, पण त्यांना कुठे कल्पना होती, की मुलगा भविष्यात डोंबाऱ्याचा खेळ करत करत गावगाव भटकत राहणार आहे. 26 मे 1990 साली आमचं लग्न झालं. आज त्याला 34 वर्ष पूर्ण झाली, त्या वेळेला बिचारी दिपा तिला कल्पनाही नसेल एका कलाकाराबरोबर संसार करायचा म्हणजे किती खडतर प्रवास असणार आहे, अगदी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यां सारखाच, मी मराठी सिनेमांमध्ये काम करत करत सातारा कोल्हापूर सांगली अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली बेळगाव पुणे नाशिक बीड लातूर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी शूटिंग करत होतो, आपला नवरा सतत फिरत राहणार आहे याची त्या बिचारीला कल्पनाच नव्हती. आजही गेली साडेचार वर्ष घरदार सोडून ठाण्यामध्ये राहते आहे, कुठल्याही परिस्थितीत अॅडजस्ट करत असते. एका कलाकाराबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काय साधी सरळ गोष्ट आहे का? दिपाला स्टॅबिलीटी, सिक्योरिटी नसताना, सतत हसत खेळत प्रसन्न राहून मला साथ देत राहिली. मी पण हा प्रवास तिच्या साथीनं तिच्यासोबत करत आलो आहे, तिची साथ सोबत नसती तर इतक्या लांबचा पल्ला गाठूच शकलो नसतो. 34 वर्षाचा एकत्र प्रवास साधा सरळ सोपा तिच्यासाठी नव्हता, मला भक्कम साथ दिल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे, आणि 34 साव्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिपा तुला खूप खूप शुभेच्छा." मिलिंदनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.