Mission Impossible 7: चित्रपट रसिकांमध्ये काही कलाकरांच्या कलाकृतींबाबत विशेष आकर्षण असतं. अशाच कलाकारंच्या गर्दीतलं एक नाव, टॉम क्रूज (Tom Cruise). या अभिनेत्याचे बरेच चित्रपट गाजले. पण, हॉलिवूडकर असो किंवा बॉलिवूडकर, टॉम क्रूजचं नाव घेतलं की पहिला उल्लेख होतो तो म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल'च्या सीरिजचा.
प्रचंड गाजलेल्या 'मिशन इम्पॉसिबल' सीरिजमधील आणखी एक चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल डेड रेकिनिंग' (Mission Impossible 7) नुकताच प्रदर्शित झाला आणि काही क्षणांतच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. स्टारकास्ट, अफलातून स्टंट, पटकथा आणि सगळंकाही कमाल असणाऱ्या या चित्रपटाबद्दलची आणखी एक आकर्षक बाब म्हणजे त्याचा विमा, अर्थात Insurance.
जाणून आश्चर्य वाटेल, पण 'मिशन इम्पॉसिबल डेड रेकिनिंग' (Mission Impossible 7) साठी निर्मात्यांनी तब्बल 823 कोटी रुपयांचा विमा काढल्याचं म्हटलं जातं. कोरोना काळाच्या आधीपासूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. पण, कोरोना माहामारीच्या लाटेमुळं संपूर्ण जग थांबलं आणि या चित्रपटाचं चित्रीकरणही. परिणामी नुकसान टाळण्यासाठी म्हणून निर्मात्यांनी चित्रपटाचाच विमा करत त्यासाठी 823 कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम मोजली. जवळपास 2300 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चातून साकारण्यात आलेल्या या सीरिजमधील हा एकमेव चित्रपटच नव्हे, तर इतरही सर्व चित्रपटांचा विमा काढण्यात आला होता.
आता तुम्ही म्हणाल हॉलिवूडमध्येच चित्रपटांचा विमा वगैरे काढला जातो. तर, असं नाहीये. इथं बॉलिवूडमध्येही बऱ्याच निर्मात्यांनी, निर्मिती संस्थांनी चित्रपटाच्या विम्यावर कोट्यवधींचा खर्च केला आहे. यामध्ये 'जर्सी' 100 कोटी रुपये, 'मोहोब्बते' 15 कोटी रुपये, 'सर्कस' 120 कोटी रुपये, 'बेल बॉटम' 120 कोटी रुपये, 'आदिपुरुष' 180 कोटी रुपये आणि 'ब्रह्मास्त्र' 350 कोटी रुपये या चित्रपटांचा समावेश आहे.
फक्त चित्रपटांचेच विमा काढले अशातला मुद्दा नाही. इथं आश्चर्यचकित होण्याची काहीच बाब नाही, कारण काही कलाकार मंडळींनी तर त्यांच्या शरीराच्या अवयवांचाही विमा केला आहे. हे अनपेक्षित होतं ना? पण, हे खरंय!
यामध्ये हॉलिवूड कलाकारंचा आकडा मोठा आहे. एक काळ गाजवणारी आणि आपल्या स्मितहास्यानं अनेकांनाच घायाळ करणारी अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्सनं तिच्या Smile चा विमा काढला आहे. यासाठी तिनं 247 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर, टेलर स्विफ्टनं पायांचा विमा काढला असून, त्यासाठी 247 कोटी रुपये मोजले. मारिया कॅरेनंही पायांचा विमा काढला असून, त्यासाठी तब्बल 8241 इतकी थक्क करणारी रक्कम मोजली आहे. डॅनिअल क्रेगनं पूर्ण शरीराचा विमा काढला जिथं त्यानं 78 कोटी रुपयांचा खर्च केला. डेविड ली रॉथनं तर सर्वांच्याच नजरा वळवल्या, कारण त्यानं चक्क स्पर्म्सचा विमा केला. ज्यासाठी त्यानं 8.3 कोटी रुपये मोजले. कलाकार आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांच्या भुवया उंचावणाराच ठरतोय असं म्हणायला हरकत नाही.