बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित OMG 2 चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा होती. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल यांची प्रमुख भूमिका होती. पण सिक्वेलमध्ये परेश रावेल यांनी काम करण्यास नकार दिला. त्यांनीच यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी OMG 2 वर भाष्य केलं होतं. यावर त्यांनी सांगितलं होतं की, "मला OMG 2 ची कथा आवडली नाही. मला माझं पात्रही आवडलं नाही. यामुळे मी या चित्रपटातून बाहेर पडलो होतो. माझ्यासाठी सिक्वेल बनवणं म्हणजे फायदा उचलण्यासारखं आहे. मला त्या पात्रात मजा येत नव्हती, म्हणून मी तो चित्रपट करणार नाही असं सांगितलं".
पुढे त्यांनी सांगितलं होतं की "जर एखाद्याला सिक्वेल बनवायचा असेल तर तो 'लगे रहो मुन्नाभाई'सारखा असला पाहिजे. 'हेरा फेरी' चित्रपटही इनकॅश करण्यासारखा आहे. त्यामुळे सिक्वेल असावा तर तो 'लगे रहो मुन्नाभाई'सारखा, जिथे तुम्ही एक लीप घेता". हे सांगत परेश रावल यांनी आपल्याला कशाप्रकारचा चित्रपट करायचा आहे हे स्पष्ट करत, OMG 2 ला नकार देण्यामागील कारणही सांगितलं होतं.
OMG 2 मध्ये परेश रावल यांच्या जाही काही नव्या अभिनेत्यांची वर्णी लागली आहे. चित्रपटात अरुण गोविल प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमित राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ओह माय गॉड चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात अक्षय कुमारने श्रीकृष्णाची भूमिका निभावली होती. तर परेश रावल यांनी देवाविरोधात खटला दाखल करणाऱ्या एका नास्तिक व्यापाऱ्याची भूमिका निभावली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यामुळे याच्या सिक्वेलची घोषणा झाल्यानंतर अनेकांना त्याची प्रतिक्षा लागली होती. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना तो आवडला आहे. पण परेश रावल चित्रपटात नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.