मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' या आगामी थ्रिलरच्या पोस्टर आणि टीझरला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. दादर येथील प्लाझा सिनेमा येथे झालेल्या या समारंभात चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
बहुप्रतीक्षित असा हा मराठी थ्रिलर महाराष्ट्रभर २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत असून त्याच्या नवीन ट्रेलरमुळे रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमधून एका गूढ खुनाची चर्चा होते. दोन लेखक, एक वर्कशॉप, रक्ताचा वास, चेहऱ्यावरील भीती, खोदलेली कबर अशा गोष्टी यातून समोर येतात आणि काहीतरी वेगळे आणि भयाण समोर येणार याची खुणगाठ प्रेक्षक बांधतो. दर्जेदार अभिनय आणि अर्थगर्भ गाणे यातून हा चित्रपट निर्मिती मुल्यांची एक चुणूक देवून जातो.
डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या पोस्टर आणि टीझरनेही अशीच उत्सुकता चाळवली होती. त्यातून या चित्रपटाची चर्चा रसिक आणि चित्रपटसृष्टीत सुरु झाली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी नक्षत्र मेढेकर , सुनील जाधव यांच्या भूमिका आहेत. निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'चीकथा पटकथा आणि संवाद श्रीनिवास भणगे यांची आहे. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. ट्रेलरच्या प्रकाशन प्रसंगी हे सर्वजण जातीने उपस्थित होते.
ट्रेलरच्या प्रकाशनानंतर बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, “ट्रेलर आणि टीझरमधून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या केवळ हिमनगाच्या टोकाएवढ्या आहेत. अजून बरेच काही प्रेक्षकांसमोर यायचे आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि अभूतपूर्व पहिल्याची अनुभूती येईल.”
प्रस्तुतकर्ते श्री संजय छाब्रिया म्हणाले, “एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ही दर्जेदार निर्मिती आणि चांगल्या कथांसाठी ओळखली जावी यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो. श्रीनिवास भणगे यांची दमदार कथा आणि तिला दिग्दर्शक व कलाकारांनी दिलेला योग्य न्याय यातून सापळा हा एक आगळावेगळा चित्रपट म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.”
चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, "मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही."
श्री दिगपाल लांजेकर यांच्या समर्थ लेखणीच्या आधारे या कालातीत कलाकृतीची पुनर्निर्मिती होत असून याची पटकथा आणि संवाद आजच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेलेले आहेत. कथेमध्ये अत्यंत बारकाईने सुधारणा करून त्यात आधुनिकता आणली गेली आहे की जेणेकरून ती आजच्या परिस्थितीला साजेशी ठरेल. समकालीन आणि कालातीत अशा दोन्हीचा एक आगळा असा मिलाफ यात साधला गेला असून त्यातून एक असा सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळेल की जो आपल्या समृद्ध अशा कथाकथन परंपरेचा एक नमूना असेल.
‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ हा एक स्वतंत्र निर्मिती स्टुडीओ असून त्यांनी गेल्या एका दशकात २३ चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केली आहे. उच्च निर्मितीमुल्ये आणि दर्जेदार कथा यांमुळे त्यांच्या चित्रपटांना बाजारमुल्य मोठे आहे. अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हॅप्पी जर्नी, तुकाराम,आम्ही दोघी,अनन्या, महाराष्ट्र शाहीर’,हे त्यांतील काही चित्रपट आहेत.