Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. याच कार्यक्रमामुळे डॉ निलेश साबळे हा सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्धीझोतात आला. “हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. निलेश साबळे यांनी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली. त्यानंतर पुढे निलेश साबळे काय करणार अशी चर्चा रंगली होती. आता लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कलर्स मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ असे या नव्या विनोदी कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमातून विनोदाचे तीन हुकमी एक्के प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा निलेश साबळे सांभाळणार आहे. तर डॉ. निलेश साबळेसोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
“हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!” या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधवदेखील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून झळकणार आहे. त्यांच्यासोबत या मालिकेत चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यादेखील असणार आहेत. भरत जाधव आणि अलका कुबल हे या कार्यक्रमात दाद देताना दिसणार आहेत. तसेच या कार्यक्रमात भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारही झळकणार आहेत.
दरम्यान डॉ. निलेश साबळेने आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीसह बॅालिवूडमध्येही डॅा निलेश साबळेचे जबरदस्त चाहतावर्ग पाहायला मिळतो. तर भाऊ कदमनेही मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला.
आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करताना दिसणार आहेत. ''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा कार्यक्रम येत्या 20 एप्रिलपासून प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहे. येत्या 20 एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.