प्रसिद्ध टीव्ही मालिका 'महाभारत' मध्ये कृष्णाची भूमिका साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले आणि आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते नितीश भारद्वाज सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचं कारण त्यांच्या खासगी आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. नुकतंच त्यांनी आपली पूर्वाश्रमीची पत्नी आणि मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस स्मिता भारद्वाज यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
अभिनेत्याने आरोप केला होता की, आपली पूर्वाश्रमीची पत्नी आपल्या जुळ्या मुलांना भेटू देत नाही आहे. त्यानंतर आता स्मिता भारद्वाज यांनी आता नितीश भारद्वाज यांची संपत्ती विकण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
23 फेब्रुवारीला स्मिता भारद्वाज यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज करत नितीश भारद्वाज यांची संपत्ती विकण्यास मदत मागितली आहे. त्यांना घटस्फोटाच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली आहे. स्मिता भारद्वाज यांनी आरोप केला आहे की, कोर्टाने मुलींची देखभाल करण्यासाठी प्रत्येकी 10-10 हजार रुपये देण्याचा आदेश दिलेला असतानाही नितीश भारद्वाज मुलींची देखभाल करण्यासाठी एक रुपयाही देत नाही आहेत.
स्मिता भारद्वाज यांनी कोर्टात नितीश भारद्वाज यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुलींची देखभाल करण्यासाठी महिन्याला 20 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. स्मिता भारद्वाज यांनी आपल्या घऱातील जुनं सामान विकण्याची परवानगी मागितली आहे. जेणेकरुन त्या सामानातून मिळालेल्या पैशांमध्ये त्या मुलींचा सांभाळ करु शकतील.
स्मिता भारद्वाज यांचे वकील चिन्मय वैद्य यांनी वांद्र्यातील कौटुंबिक कोर्टात 'डार्कहास्ट' याचिका दाखल केल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, नितीश भारद्वाज यांच्याकडून पत्नीला मुलींच्या देखभालीसाठी कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत. कोर्टाने यासंबंधी आदेश दिला होता. यामुळेच आम्ही ही वसूली करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. कोर्टाने हा याचिका दाखल करुन घेतली असून, प्रकरण प्रलंबित आहे.
तर नितीश भारद्वाज यांनी आपण यासंबंधी आपल्या वकिलांशी चर्चा करु असं संगितलं आहे. जर त्यांच्याकडून अशी याचिका दाखल झाली असेल तर आम्ही त्याला उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलं आहे.
नितीश भारद्वाज यांनी मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी 14 मार्च 2009 रोजी लग्न केलं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. त्यांचा पहिल्या लग्नात घटस्फोट झाला होता. काही मित्रांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. 2019 मध्ये अभिनेत्याने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.