NMACC Daulat Ki Chaat: सोशल मीडियासह सध्या संपूर्ण जगभरात अंबानी कुटुंबाने (Ambai Family) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण अंबानी कुटुंबाने नेहमीप्रमाणे अगदी शाही पद्धतीने हा कार्यक्रम आय़ोजित केला होता. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) अनावरण कार्यक्रमात फक्त बॉलिवूड (Bollywood) नव्हे तर सर्व क्षेत्रातील आणि जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान अंबानी कुटुंबाने या पाहुण्यांसाठी जेवणाची खास व्यवस्था केली होती. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही राजेशाही थाट म्हणजे नेमकं काय असतं याची कल्पना येईल.
अंबानी कुटुंबाचा एखादा कार्यक्रम असेल आणि त्याची चर्चा होणार नाही असं होणार नाही. अंबानी कुटुंबाने NMACC च्या निमित्ताने आय़ोजित केलेल्या पार्टीत पाहुण्यांना चक्क चांदीच्या ताटातून जेवण वाढलं होतं. सोशल मीडियावर पंचपकवानाने भरलेल्या या ताटाचे फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान यावेळी पाहुण्यांसाठी गोड पदार्थ म्हणून 'दौलत की चाट' ठेवण्यात आलं होतं. त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांना त्याच्याभोवती लावलेल्या नोटा पाहून आश्चर्य वाटत आहे.
अंबानींच्या पार्टीत सहभागी झालेल्या काही पाहुण्यांनी पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोत उत्तर भारतात प्रसिद्ध असणारी 'दौलत की चाट' दिसत आहे. या फोटोत या चाटच्या भोवती 500 च्या नोटा लावलेल्या दिसत आहे. आता या नोटा खरंच पाहुण्यांना दिल्या का? पण त्या का लावण्यात आल्या होत्या? असे अनेक प्रश्न अनेकांना सतावत आहेत.
पण जर तुम्ही नीट निरखून पाहिलंत तर या नोटा खऱ्या नाहीत. हा नोटा खोट्या असून त्याच्या नावाला साजेसा लूक देण्यासाठी लावण्यात आल्या आहेत. दिल्लीमधील प्रसिद्ध रेस्तराँ 'इंडियन अॅक्सेंट' मधील ही डिश चांगलीच प्रसिद्ध आहे. तिथे अशाचप्रकारे नोटा लावून ही डिश दिली जाते.
उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ही डिश मिळते. हिवाळ्यात फक्त दोन महिने ही डिश उपलब्ध असते. ही डिश बनवताना जे पदार्थ वापरले जातात त्याच्या आधारेच तिला 'दौलत की चाट' असं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान अंबानीच्या पार्टीत पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण वाढण्यात आलं. या ताटात पालक पनीर, डाळ, करी, रोटी, पापड, आमरस असे अनेक पदार्थ होते. शुक्रवारी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पण पुढील दोन दिवस पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भारतासह जगभरातील अनेक दिग्गज हजर होते.