आता गोवा 'नो सेल्फी' झोन

सेल्फीवर बंदी

अनिल पाटील, झी मीडिया, गोवा : सी ,सँड अँड फन साठी प्रसिद्ध असणारे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणजे गोवा. मात्र गेल्या काही दिवसात हेच पर्यटन स्थळ अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे गोवा प्रशासन सतर्क झालं आहे. गोव्यात दररोज हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांना भूरळ घालतात. या समुद्रात उतरण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.  मात्र पावसाळ्यात हे समुद्रकिनारे पोहण्यासाठी पूर्णपणे धोकादायक ठरतात.

मात्र पर्यटक दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून जीवावर उदार होऊन समुद्रात जातात आणि जीव गमवतात. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारे सात पर्यटकांना जलसमाधी मिळाली. तर काहीजण बुडताना वाचलेत . समुद्रात बुडण्याचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण प्रशासन सतर्क झाले आहे. आता गोवा सरकारनं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी मरीनची नेमणूक केली आहे. सुमारे १०५ किलोमीटरच्या किनाऱ्यावर ६५० लाईफ गार्ड तैनात केले असून त्यांना आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे . नव्याने लाईफ गार्डची नेमणूक करण्यात येत आहे . दुसरीकडे सर्वच किनारे सीसीटीव्ही खाली आणण्यात आलेत . किनाऱ्यावरील सुरक्षा लक्षात घेऊन सर्व किनाऱ्यांवर पोहण्यासाठी बंदी घातली असून त्यासाठीची लाल झेंडे लावण्यात आले आहेत .  

तर गोव्यातील २६ धोकादायक ठिकाणी  आता काही सेल्फी घेण्यावर बंदी घातली आहे. तशा प्रकारचे साईन बोर्ड लावले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारनं कडक पावलं उचलीत..मात्र यासाठी पर्यटकांनी स्वत: शिस्त बाळगणं तितकंच महत्वाचे आहे.