झी युवा सन्मानच्या मंचावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले नेतृत्वाचे शिलेदार!

झी युवा सन्मान  पुरस्कारांचे मानकरी कोण होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागले होते. समाजातील विविध  क्षेत्रांमध्ये झोकून काम करत असलेल्या १२ क्षेत्रातील तरूणाईची निवड झी युवा वाहिनीने या पुरस्कारांसाठी केली आहे.

Updated: Mar 22, 2023, 09:44 PM IST
झी युवा सन्मानच्या मंचावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले नेतृत्वाचे शिलेदार! title=

मुंबई : लहानपणापासून एखाद्या क्षेत्राचे बाळकडू मिळावे आणि त्या संधीचे सोने करावे असे टर्निंग पॉइंट कमी जणांच्या आयुष्यात येतात. त्यात जर ते क्षेत्र राजकीय नेतृत्वाचे असेल तर कृतीशील यश मिळवण्यासाठी कस लागतो. अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून पदवी हातात असताना खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांचा ठाण्यातील एक युवक ते लोकसभेतील युवा खासदार हा प्रवास प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत श्रीकांत शिंदे यांनी देशाच्या राजकारणात उमटवलेला ठसा लक्ष वेधून घेणारा आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर झी युवा वाहिनीने युवा सन्मान पुरस्काराचं नाव कोरलं आहे.
 
झी युवा सन्मान  पुरस्कारांचे मानकरी कोण होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागले होते. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये झोकून काम करत असलेल्या १२ क्षेत्रातील तरूणाईची निवड झी युवा वाहिनीने या पुरस्कारांसाठी केली आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूतावर २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. 

या मंचावर समाजातील कर्तृत्ववान तरूणाईच्या कामाचं कौतुक व्हावं, भविष्य उजवल करणाऱ्या तरूणाईचे समाजाने अनुकरण करावे या हेतूने झी युवा वाहिनीने झी युवा सन्मान पुरस्कारांची घोषणा केली आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्यासह माझा व डेरीमिल्क यांचे या सोहळ्याला सहकार्य मिळालं आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. वडील एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेला राजकीय वारसा उत्तमपणे चालवत त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. खरंतर श्रीकांत यांनी वैदयकीय शिक्षण घेतलं आहे. ऑर्थोपेडीक विषयातील ते तज्ज्ञ आहेत. मात्र राजकारणाची आवड, अभ्यासू वृत्ती यामुळे श्रीकांत शिंदे हे वयाच्या २८ व्या वर्षी खासदार झाले. सामान्यांचे प्रश्न जाणणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. 

संसदेत आरोग्य व कुटुंब कल्याण, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय या विभागातील श्रीकांत शिंदे यांचे काम उल्लेखनीय आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी श्रीकांत यांनी मतदारसंघात केलेले काम अनुकरणीय आहे. आरोग्यसुविधा राबवण्यासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशन स्थापन केलं आहे. समाजकारणातून राजकारण हा त्यांचा वसा आहे. गरजू विद्यार्थी, कष्टकरी, रिक्षाचालक, रोजंदारी कामगार यांना मदतीचा हात देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील दातृत्व नेहमी सजग असते. 

वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेल्या नेतृत्वगुणाला अभ्यासूवृत्तीची जोड देत खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवानेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. डॉ. शिंदे यांच्या याच कर्तृत्वाची दखल घेऊन झी युवा वाहिनीने त्यांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित केले आहे.

युवकांशी जोडलेल्या अनेक संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यासाठी झी युवा या वाहिनीचे मोठे योगदान आहे. या वाहिनीने आजवर मालिका, विेशेष कार्यक्रम यामधून आजची तरूणाई, तिचे विचार, मतं यावर प्रकाश टाकला आहे. मग समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तरूणाईचा सन्मान करण्यासाठी झी युवा वाहिनी नक्कीच मागे राहणार नाही. २२ मार्च रोजी सायंकाळी ७ झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर समाजातील हरहुन्नरी, सक्रिय तरूणाईच्या पंक्तीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव आहे.