नवी दिल्ली : पद्मावती बद्दल लोकांच्या मनातील संताप दिवसेंदिवस वाढत आहे. इतकंच नाही तर राजपूत संघटनेकडून अभिनेत्री दीपिकाला नाक कापण्याची तर दिग्दर्शक भन्साळींना शीर कापण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या पेटलेल्या वादावर शुक्रवार दीपिकाने मीडियाशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दल आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या.
पद्मावतीच्या प्रदर्शनावर असलेली टांगती तरवार कायम आहे. याबद्दल दीपिका म्हणते, "मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे." इतकंच नाही तर तिने दिग्दर्शक भन्साळींचे आभार मानले आहेत. त्याबद्दल ती म्हणते, "मी संजय लीला भन्साळींची खूप आभारी आहे. माझ्याकडे त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीयेत."
एकीकडे पद्मावतीचा विरोध इतका तीव्र झालाय की, महाराणी पद्मावतीचे निवासस्थान असलेला राजस्थानचा प्रसिद्ध चित्तोडगडाचे दरवाजे आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे आणि अनेक महिला देखील त्यात सहभागी झाल्या आहेत. ऐतिहासिक तथ्यांना मुरड घालून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.
सर्व समाज विरोध समितिचे सदस्य रणजीत सिंग यांनी सांगितले की, "आम्ही आज सकाळी १० वाजता चित्तोडगडच्या पदन पोल गेट बंद केला आणि किल्ल्यात कोणालाही जाण्यास मनाई केली आहे. हा शांतिपूर्वक विरोध असून तो ६ दिवसांपर्यंत कायम राहील."
यापूर्वी दीपिकाला मिळालेल्या धमकीमुळे अभिनेत्री दीपिकाच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. करणी सेनेचे नेते महीपाल सिंह मकराना यांनी सांगितले की, "दीपिका पदुकोण आमच्या भावना भडकवत आहे. जर तिने हे बंद न केल्यास शूर्पणखेप्रमाणे तिचे नाक कापण्यात येईल."