Shruti Marathe Casting Couch : 'राधा ही बावरी' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री श्रुती मराठेला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. श्रुती ही तिच्या अभिनयासोबत तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. श्रुतीन अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण अनपेक्षितपणे तिला मराठी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. याचा खुलासा तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
श्रुतीनं ही मुलाखत 'आरपार' या युट्यूब चॅनेलला दिली होती. या मुलाखतीत श्रुती म्हणाली की एक मुलगी म्हणून मला अनेक नाही पण काही मर्यादा आहेत हे जाणवलं. पण त्यातही एखादी गोष्ट सांगितली तर इतका काही फार प्रॉब्लम होत नाही. अनेक वर्षांपूर्वी मला मराठीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तेव्हा अभिनय क्षेत्रात येऊन मला काही वर्ष झाली होती. त्यामुळे मी काही नवीन नव्हते. नटी उपलब्ध असतात, असा आपल्या चित्रपटसृष्टीविषयी असलेला मोठा गैरसमज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऐकायला खूप घाण वाटतं. हे कोणी पसरवलं? कसं सुरू झालं? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमूक एक गोष्ट करावीच लागते, हे कुठून आलं?'
पुढे याविषयी सविस्तर सांगत श्रुती तिला आलेला अनुभव सांगत म्हणाली, 'एक चित्रपट होता, त्यासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. भेटायला आल्यानंतर त्यांनी मला चित्रपचासाठी माझं मानधन किती असेल हे विचारलं. आम्ही दोघं बोलत होतो. तेव्हा त्यांनी अचानक मला सांगितलं की तू जर माझ्यासोबत हे केलंस तर मी तुला पाहिजे तितकं मानधन देईन. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे ते माझ्यासमोर म्हणाले. त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर पुढचे दोन-तीन मिनिटं मी ब्लॅंक झाले होते. मला काही कळेना, घाम फुटला. कारण याआधी असं कधीच झालं नव्हतं. त्यामुळे असं काही कधी होईल याची कल्पना नाही आणि आता करायचं काय हे मला कळेना. तेव्हा माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे आता काही तरी उत्तर द्यायला हवं.'
हेही वाचा : सुरक्षारक्षकानं अमिताभ यांच्या नातवाला समजलं डिलीव्हरी बॉय; स्वत: अगस्त्यने सांगितला किस्सा
श्रुतीनं पुढे फायनान्सरला दिलेल्या सडेतोड उत्तराविषयी सांगितल, 'मी त्यांना म्हणाले की अच्छा, म्हणजे मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का? माझं हे बोलणं ऐकल्यानंतर ते म्हणाले की तू हे काय बोलतेस? पुढे त्यांना म्हणाले, 'मी असं काहीतरी करते ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली? कोणाशी बोलताना थोडा तरी अभ्यास करत जा,' याचा खुलासा श्रुतीनं केला.