गेहना वशिष्ठ पॉर्न फिल्म प्रकरण : एका उद्योगपतीचा माजी पीए उमेश कामत पोलिसांच्या ताब्यात

बड्या हस्तींची नाव समोर येण्याचा संशय 

Updated: Feb 12, 2021, 04:18 PM IST
गेहना वशिष्ठ पॉर्न फिल्म प्रकरण : एका उद्योगपतीचा माजी पीए उमेश कामत पोलिसांच्या ताब्यात  title=

मुंबई :  मॉडेलला फसवून पॉर्न फिल्म बनवणा-या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री गेहना वशिष्ठ नंतर आता उमेश कामत नावाच्या एका हायप्रोफाईल व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे उमेश कामत हा एका बड्या उद्योजकाचा पीए होता. त्यामुळे आता या प्रकरणात मोठी नावं समोर येणार की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

या पॉर्न फिल्मचे जाळे परदेशातही पसरल्याचे तपासात समोर आले आहे.उमेश हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा पीए होता. नोकरी गेल्यानंतर उमेश पॉर्नच्या धंद्यात शिरल्याचं म्हटलं जात आहे. परदेशी ऍपला पार्न फिल्म विकून उमेश आणि गेहना कोट्यवधी रुपये कमावत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. 

Hot Movies नावाची वेबसाईट तयार करुन त्यावर या फिल्म विकल्या जात होत्या. उमेश त्याचे परदेशातील सोर्स वापरुन या फिल्म जगभर विकत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.  हा व्हिडीओ केव्हा आणि कसा अपलोड करायचा, यासंबंधीचे सर्व निर्णय उमेश घेत होता. पोलिसांनी उमेशला अटक केल्यामुळे आता याप्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. उमेशला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

काय आहे हे प्रकरण? 

चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून तरूण-तरुणींना पॉर्न इंडस्ट्रीच्या जाळ्यात ओढणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मढ येथील ग्रीन विला या बंगल्यामध्ये अश्लिल शूटिंग चालल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यावरून बंगल्यावर छापा टाकला. यावेळी अश्लिल दृष्याचं चित्रीकरण सुरूच होतं. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठलादेखील होती. विशेष म्हणजे तीच या तथाकथित वेबसिरीजची मेकर असल्याचं समोर आलं आहे. तिच्यासह दोन अभिनेते, एक ग्राफिक डिझायनर  महिला, एक फोटोग्राफर आणि एका कॅमेरामनला अटक झाली आहे.

गहनानं एक प्रॉडक्शन हाऊस उघडलं होतं. त्याच्या माध्यमातून बॉलिवूडचं ऍट्रॅक्शन असलेल्या तरूण-तरुणींनी आपल्या जाळ्यात ओढायचं. प्रथम छोट्या सिरीज केल्यानंतर मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळतील, असं आमिष दाखवायचं आणि अश्लिल दृष्य द्यायला लावायची, असा उद्योग सुरू असल्याचा आरोप होतोय. 'गंदी बात' या वेबसिरीजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गहना वसिष्ठ काही प्रथमच वादात अडकलेली नाही.