Jilabi Movie : गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपानं आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हा चित्रपट 17 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच असं काहीसं पाहायला मिळणार आहे, ज्याची अपेक्षा कोणालाही नसणार.
अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयानं मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. या चित्रपटाचं आकर्षक असे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टरमधील कलाकारांचे लूक लक्ष वेधून घेणारे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी कायमच वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जिलबी’ च्या निमित्तानं रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने मनोरंजनाची भन्नाट मेजवानी त्यांनी आणली आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट, उत्कृष्ट कलाकार यांना एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना लाभणार आहे. सोशल माध्यमावर मजेशीर कोडं टाकत चित्रपटाच्या प्रमोशनाकरिता अनोखा फंडा वापरण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मराठी प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा चित्रपट जबरदस्त मनोरंजनाची ट्रीट असेल असं निर्माते आनंद पंडित सांगतात. गोड आणि गूढ अशी ‘जिलबी’ प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि तिच्या मनोरंजनाचा चविष्ट आस्वाद प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे व्यक्त करतात.
हेही वाचा : 'मध्यरात्री शाहरुख खान मला...'; छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीनी केला खुलासा, म्हणाली 'अपघातानंतर तो...'
‘जिलबी’चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. दरम्यान, प्रेक्षक आता या पोस्टरमुळे जास्त उत्सुक आहेत. त्यामुळे आता नेमकं त्यांना काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यास उस्तुक आहेत.