Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan : मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी म्हणून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्याकडे पाहिले जाते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सध्या ते दोघेही विविध कार्यक्रमात व्यस्त आहेत. नुकतंच मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतरचा पहिला डोंबिवलीला ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी नुकतंच ‘स्वरपौर्णिमा’ या कार्यक्रमाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्यांनी हा कार्यक्रम हाऊसफुल झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी मुग्धा आणि प्रथमेश हे हातात हाऊसफुलची पाटी घेऊन आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांनी या पोस्टला हटके कॅप्शनही दिले आहे.
“आणखी एक हाऊसफुल्ल! काल मी आणि प्रथमेशने आमच्या लाडक्या म्युझिशियन्स दादांबरोबर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम सादर केला. नेहमीप्रमाणेच डोंबिवलीकर मायबाप रसिकांनी कालच्या कार्यक्रमाला हाऊसफुल प्रतिसाद दिला. हाऊसफुलच्या बोर्डाबरोबर फोटो काढण्याचं समाधान प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठं असतं जसं ते आमच्याही चेहऱ्यावर झळकतंय. खूप खूप खूप मनापासून धन्यवाद, रसिकहो…लगेचच दुसरीकडे जाण्याची घाई असल्यामुळे रसिकांबरोबर फोटो काढायचे राहिले. पुढच्यावेळी नक्की काढू…”, असे कॅप्शन मुग्धाने दिले आहे.
मुग्धाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एकाने कार्यक्रम खूपच सुरेख झाला, असे म्हटले आहे. तर एकाने वाह... खूप अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तसेच एकाने अभिनंदन अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही सोशल मीडिया फारच सक्रीय असतात. त्या दोघांनीही “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांचं नातं जगासमोर आणलं होतं.