दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने (Rana Daggubati) अभिनेत्री सोनम कपूरची (Sonam Kapoor) जाहीर माफी मागितली आहे. एका कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर सोनम कपूरबद्दल इतक्या प्रमाणात नकारात्मकता पसरली असल्याची खंत व्यक्त करत त्याने माफी मागितली आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना राणा डग्गुबतीने सोनम कपूरचं नाव न घेता म्हटलं होतं, एका 'हिंदी अभिनेत्री'ने चित्रपटाच्या सेटवर दुलकर सलमानचा (Dulquer Salman) वेळ वाया घालवला. सोनम आणि सलमानने 'द झोया फॅक्टर' चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
राणाने नव्याने ट्वीट करत आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सोनम कपूर आणि सलमानची माफी मागितली आहे. "मी केलेल्या विधानामुळे सोनम कपूरला ज्या नकारात्मकतेचा सामना करावा लागत आहे त्यामुळे मी व्यथित झालो आहे. मी केलेलं विधान हे गांभीर्याने केलेलं नव्हतं आणि ते त्याच प्रकारे घेतले जावे अशी अपेक्षा होती. मित्र या नात्याने आम्ही नेहमीच एकमेकांवर खेळीमेळीच्या वातावरणात अशा कमेंट करत असतो. पण माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला याचा मला खेद आहे," असं राणाने म्हटलं आहे.
पुढे त्याने म्हटलं आहे की, "मी सोनम आणि सलमान यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मी त्यांचा खूप आदर करतो. मला आशा आहे की या स्पष्टीकरणामुळे कोणतेही अंदाज आणि गैरसमज संपुष्टात येतील. तुम्ही समजून घेतलंत त्याबद्दल आभार".
I am genuinely troubled by the negativity that has been aimed at Sonam due to my comments, that are totally untrue and were meant entirely in a light-hearted manner. As friends, we often exchange playful banter, and I deeply regret that my words have been misinterpreted.
I take…— Rana Daggubati (@RanaDaggubati) August 15, 2023
किंग ऑफ कोठा चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात राणाने म्हटलं होतं की, "अॅक्टिंग स्कूलमध्ये सलमान माझा ज्युनिअर होता. आमची तिथे मैत्री झाली. तो फार शांत व्यक्ती आहे. तो हिंदी चित्रपटात काम करत असून, निर्माते माझे मित्र आहेत. याचं शुटिंग माझ्या घऱाजवळच सुरु होतं. मी तिथे सलमानला भेटण्यासाठी गेलो होतो".
"मी तिथे स्पॉटबॉयसह एका कोपऱ्यात उभाा असताना चित्रपटात काम करणारी हिंदीतील एक मोठी अभिनेत्री फोनवर आपल्या पतीसह लंडनमध्ये खरेदी करण्यासंबंधी चर्चा करत होती. तिचं व्यवस्थित लक्ष नसणं शुटिंगच्या दर्जावर प्रभाव पाडत होतं, ज्यामुळे सेटवरील सर्वजण चिडले होते. या स्थितीमुळे अडचणी येत असतानाही सलमान शांत होता. तो तणाव कमी करत होता आणि वातावरण खेळीचं ठेवत होता," असं राणाने म्हटलं होतं. पण यामुळे राणाही नाराज झाला होता आणि त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना सुनावलं होतं.
द झोया फॅक्टर चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही फेटाळलं होतं. सोनम 'ब्लाइंड' चित्रपटात अखेरची दिसली होती. दरम्यान सलमान आाता गन अँड गुलाब आणि किंग ऑफ कोठामध्ये दिसणार आहे. राणा सलमानसह कांथा या बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती करणार आहे.