मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्तची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षक या सिनेमाची जिथे आतुरतेने वाट पाहत आहेत. तेथेच सिनेमाच्या प्रदर्शनासमोर विघ्न उभे राहिले आहेत.
एक सामाजिक कार्यकर्ता पृथ्वी याने सिनेमाच्या एका सीनबाबत तक्रार केली आहे. पृथ्वीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे याची तक्रार केली आहे. एएनआयला मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पृथ्वी याने सीबीएफसी चीफ प्रसून जोशी, रणबीर कपूर आणि राजकुमार हिरानी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक सीन दाखवला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर जेलच्या बेराकमध्ये दिसत आहे. त्यात अचानक टॉललेट ऑवरफ्लो होतो. हा सीन सगळ्यांच्याच अंगावर आला आहे. पृथ्वीच्या माहितीनुसार, प्रशासन कारागृहाची चांगली काळजी घेतात. या अगोदर आम्ही कधीच अशा घटनांबद्दल ऐकलेलं नाही. या अगोदरही अनेक सिनेमे गँगस्टरवर प्रदर्शित झालेत मात्र असं कुणीही दाखवलं नाही.
तक्रारीत पृथ्वीने असं लिहिलं आहे की, या सीनच्या विरूद्ध काही केलं नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. राजकुमार हिरानीच्या दिग्दर्शनातील हा सिनेमा 29 जून रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमांत रणबीरसोबतच दिया मिर्झा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, परेश रावल, अनुष्का शर्मा, करिश्मा तन्ना आणि विक्की कौशल सारखे कलाकार आहेत.