मुंबई : बॉलिवूडचं हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा विवाह पार पडल्यानंतर आज त्यांचा मुंबईत रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. 21 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये त्यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला होता. दीपिकाच्या आई-वडिलांनी हा सोहळा होस्ट केला होता. त्यानंतर आज बॉलिवूडकरांसाठी आणि मित्रपरिवारासाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.
दीपिका आणि रणवीरने रिसेप्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नये. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या फाऊंडेशनला डोनेट करण्याची विनंती केली आहे. रिसेप्शन कार्डवर त्यांनी याची माहिती दिली आहे.
इटलीतील लेक कोमो येथे 14 आणि 15 नोव्हेंबरला विवाह केल्यानंतर आता मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज हजेरी लावतील. रणवीर आणि दीपिका यांनी लग्न सोहळ्यांसाठी मोजक्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे बॉलिवूडकरांना ते आज रिसेप्शन पार्टी देणार आहेत. येणाऱ्या 1 डिसेंबरला आणखी एक ग्रँड रिसेप्शन ठेवलं जाणार आहे. याची सुरुवात रात्री 9 वाजता होणार आहे. या रिसेप्शनमध्ये सगळ्यांना ड्रेसकोडनुसार काळ्या रंगाची टाय घालावी लागणार आहे.
रिसेप्शन सोहळा झाल्यानंतर रणवीर सिंह सिंबा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. यावर्षीच हा सिनेमा रिलीज होणार आहे. रणवीर पहिल्यांदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका देखील तिचा पुढचा प्रोजेक्ट मेघना गुलजारसोबत करत आहे. या सिनेमाची शूटिंग मार्च 2019 पासून सुरु होणार आहे.