'नेहाला त्या प्रसंगातून वाचवण्याचा मी प्रयत्न केला पण.... '

आदित्य नारायणची 'त्या' प्रकरणी लक्षवेधी प्रतिक्रिया   

Updated: Oct 27, 2019, 11:11 AM IST
'नेहाला त्या प्रसंगातून वाचवण्याचा मी प्रयत्न केला पण.... '

मुंबई : रिऍलिटी शो हे अनेक कारणांसाठी चर्चेत असतात. परिक्षकांपासून त्यातील स्पर्धांपर्यंत सर्वच कारणं या प्रसिद्धीला वाव देतात. पण, गेल्या काही दिवसांपासून 'इंडियन आयडॉल' या रिऍलिटी शोचं अकरावं पर्व हे एका भलत्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

एका अतिउत्साही स्पर्धकाने या कार्यक्रमादरम्यान परिक्षक असणाऱ्या गायिका नेहा कक्कर हिला अचानकच किस केलं होतं. नेहाला मिठी मारुन त्याने किस करातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्य़ानंतर अनेकांनीच याविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. 

सर्वत्र याविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता 'इंडियन आयडॉल'चा गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण यानेही याविषयीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपली प्रतिक्रिया दिली. 'एक सूत्रसंचालक म्हणून मी नेहाला त्या प्रसंगी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर जे काही झालं ते मात्र आमच्या हातात नव्हतं', असं तो म्हणाला. 

नेहाप्रती असणाऱ्या चाहत्याच्या प्रेमाविषयी सांगत आदित्यने त्यच्या दंडावर नेहाचा टॅट्टू असल्याचंही स्पष्ट केलं. पण, याचवेळी अशा गोष्टींकडे आणि कृत्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचं म्हणत ही सर्वसाधारण बाब नसल्याचंही अधोरेखित केलं. आजवर परिक्षक अनेकदा व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे एक सूत्रसंचालक म्हणून त्यांच्याशी कोणतीही गैरवर्तणूक केली जाणार नाही याची आपण काळजी घेत असल्याचंही त्याने सांगितलं. शिवाय स्पर्धकाच्या दृष्टीकोनातून त्याने या प्रसंगाची माहिती देत स्पर्धकांनीही काही मर्यादा पाळल्या पाहिजेत असं तो म्हणाला.