Renukaswamy Murder: कन्नड अभिनेता दर्शनने अखेर दिली कबुली; पवित्राने चपलीने मारल्याचं उघड

Renukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून, पोलीस तपास कर आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी उधारीवर पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.   

Updated: Jun 22, 2024, 02:46 PM IST
Renukaswamy Murder: कन्नड अभिनेता दर्शनने अखेर दिली कबुली; पवित्राने चपलीने मारल्याचं उघड title=

Renukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आपल्या मित्राकडून 40 लाख रुपये घेतले होते. हे पैसे त्याने एका आरोपीला दिले असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान टाइम्स नाऊने दिलेल्या रिपोर्टनुसार, दर्शनने हत्येच्या साक्षीदारांना पैसे देण्यासाठी मित्राकडून 40 लाख घेतल्याची कबुली दिली आहे. 

पोलिसांनी दर्शनच्या घरात बॅगेतून 37.4 लाख मिळवले. 

रिपोर्टनुसार, ज्या शेडमध्ये रेणुकास्वामीची हत्या केली तेथील सुरक्षारक्षकांना शांत राहण्यासाठी काही पैसे दिले होते. दरम्यान पोलिसांना दर्शनच्या घरी एक हिरव्या रंगाची पुमाची बॅग सापडली आहे. त्यातील 37.4 लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिवाय, पोलिसांनी दर्शनच्या फॅन असोसिएशनच्या प्रमुखाच्या घरातून 4.5 लाख जप्त केल्याची माहिती आहे.

पवित्राने रेणुकास्वामीला चपलेने मारलं

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेणुकास्वामी खून प्रकरणातील आणखी एक आरोपी, अभिनेता पवित्र गौडा याने पीडितेला तिच्या चप्पलने मारहाण केली होती. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटवरून ती ठराविक काळासाठी खुनाच्या ठिकाणी होती असं सूचित होत आहे. पोलिसांनी पवित्राच्या घरातून चप्पल, कपडे, साहित्य आणि इतर कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.

दरम्यान या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणारी अभिनेत्री पवित्राला याप्रकरणी आरोपी क्रमांक एक आणि गुन्हा पर पडणारा दर्शन हा आरोपी क्रमांक दोन आहे. रेणुकास्वामी हत्येप्रकरणी दर्शन आणि पवित्रा तसंच अन्य 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पोलीस रेणुकास्वामीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेला डेटा मिळवण्यासाठी मेटाशी संपर्क साधणार आहेत. हा सर्व डेटा डिलीट करण्यात आला आहे. 

इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ

सोमवारी पोलिसांनी सांगितलं की, रेणुकास्वामीची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, धनराज केबल कर्मचारी आहे. धनराजने पोलिसांना सांगितलं आहे की, प्रकरणातील आणखी एक आरोप नंदीशने त्याला बंगळुरुमधील गोडाऊनमध्ये बोलावलं होतं. तिथे रेणुकास्वामीला शॉक देण्यासाठी एका डिव्हाइसचा वापर करण्यात आला. पोलिसांनी हे डिव्हाइसही जप्त केलं आहे. 

कारही जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी 9.30 वाजता रेणुकास्वामीचा रिक्षातून पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याचा एक सहकारी स्कूटरवरुन त्यांना फॉलो करताना दिसत आहे. पोलिसांनी रेणुकास्वामीच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही कार चित्रदूर्ग जिल्ह्यात अय्यनहल्ली गावात एका घराबाहेर बाहेर उभी होती. आरोपींपैकी एक रवीने ही कार तिथे सोडली होती. रवीच्या कुटुंबाकडे चौकशी केल्यानंतर या कारमधून अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. 

शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे

याआधी जी माहिती समोर आली होती त्यात सांगण्यात आलं होतं की, रेणुकास्वामीचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरिरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याचे निशाण दिसले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचं नाक, जीभ कापण्यात आली होती. तसंच जभडाही तोडण्यात आला होता. त्याच्या शऱिरातील जवळपास सर्वच हाडं मोडली होती. त्याच्या खोपडीला फ्रॅक्चर होतं.