'रोजा' फेम अभिनेत्याला ओळखलं?

 पुन्हा एकदा एका नव्या रुपात..... 

Updated: Jan 18, 2020, 10:32 PM IST
'रोजा' फेम अभिनेत्याला ओळखलं?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांची लोकप्रियता बऱ्याच वर्षांपूर्वी अशी काही वेगाने वाढू लागली की, हिंदी आणि मराठी भाषिक प्रेक्षकांनीही या चित्रपटांना पसंती दिली. मुळचे दाक्षिणात्य पण, हिंदीमध्ये डब झालेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यात काही नावं घ्यायची झाली तर ती म्हणजे 'रोजा' आणि 'बॉम्बे'. अशा चित्रपटांमधून झळकलेला अभिनेता अरविंद स्वामी हा पुन्हा एकदा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यावेळी त्याच्या वाट्याला आलेली भूमिका अनेक अंशी महत्त्वाची आहे. कारण, ही भूमिका आहे तमिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एमजीआर यांची. एमजीआर यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त अरविंद स्वामी याने‘थलायवी’ चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक शेयर करण्यात आला. 

बॉलिवूड अभिनेत्री क्वीन कंगना या चित्रपटात मुख्य म्हणजेच जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील तिच्या लूकवरुनही पडदा उचलला गेला होता. तेव्हापासूनच 'थलायवी'विषयीची प्रेक्षकांमध्ये कुतूहल होतं. त्यातच आता अरविंदचा लूक आणखी भर टाकत आहे. 

एक अभिनेता आणि यशस्वी नेता म्हणून एमजीआर यांच्या जीवनातील काही प्रसंग या चित्रपटातून उलगडले जाणार आहेत. 

जयललिता यांच्या स्टारडम आणि राजकारणाच्या प्रवासात एमजीआरची भूमिका ही सर्वज्ञात आहे. म्हणूनच, केवळ अशा भागासाठी उपयुक्त वाटणारा अभिनेताच नव्हे तर एमजीआर यांच्या जीवनप्रसंगांक़डे गांभीर्याने पाहणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाणं आवश्यक होतं, ज्यामुळे या भूमिकेसाठी अरविंद स्वामीची वर्णी लागली.