मुंबई : इरफान खानने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याने आपल्या अभिनयाने प्रत्येक वर्गातल्या प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. असं म्हटले जातं की, अभिनयात सर्वात महत्वाची भूमिका डोळ्यांची असते आणि एका हुशार कलाकाराला आपल्या डोळ्यांने संवाद कसा साधावा हे माहित असतं. याचच दांडगं उदाहरण म्हणजे इरफान, त्याला ही कला जन्मापासूनच मिळालेली होती. 29 एप्रिलला अभिनेता इरफान खानची पहिली पुण्यतिथी आहे.
इरफानचा जन्म राजस्थानच्या जयपूरमधील मुस्लिम पठाण कुटुंबात झाला होता. पठाण कुटुंब असूनही इरफान लहानपणापासूनच शाकाहारी होता. यामुळे त्याचे वडील नेहमीच असे म्हणत, त्याला चिडवत असत की पठाण कुटुंबात ब्राह्मण जन्माला आला. इंडस्ट्रीत आल्यानंतर इरफानने खूप संघर्ष केला. एनएसडीमध्ये प्रवेश केल्यावर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर इरफानला घरातून पैसे मिळणं बंद झालं. एनएसडीकडून फेलोशिपव्दारे त्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला.
बॉलिवूड जगतात आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या इरफान खानने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने ओळख निर्माण केली. बराच संघर्ष पाहिल्यानंतर त्याला 'सलाम बॉम्बे' नावाचा एक चित्रपट मिळाला ज्यामध्ये त्याची अगदी लहान भूमिका होती. आपल्या छोट्याशा पात्राने लोकांचे लक्ष वेधून घेणार्या या अभिनेत्याने यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही.
यानंतर 'द वारियर', 'मकबूल', 'हासिल', 'द नेमसेक', 'रोग', 'पान सिंह तोमर', 'द लंचबॉक्स', 'तलवार', 'लाइफ ऑफ पाई', 'मुंबई मेरी जान', 'साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्नस', 'हिंदी मीडियम' साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न्स', 'हिंदी मीडियम' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करून इरफानने प्रेक्षकांच्या हृदयात आणि इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केलं. २०११ मध्ये त्याला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलं होतं.
त्याचप्रमाणे इरफान हॉलिवूडमध्येही सक्रिय होता. त्याने 'स्पायडर-मॅन', 'जुरासिक वर्ल्ड' आणि ''इन्फर्नो यासारख्या चित्रपटात काम केलं. हॉलिवूड अभिनेता टॉम हॅन्क्सने एकदा बोलताना त्याचं कौतुक केलं होतं की, इरफान त्याच्या डोळ्यांतून अभिनय करतो. २०१३ मध्ये 'पानसिंह तोमर' चित्रपटासाठी इरफान खानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इरफान अखेर 'इंग्लिश मीडियम' या चित्रपटात दिसला होता.