ऋतुजा बागवे झळकणार 'या' हिंदी मालिकेत; भूमिकेविषयी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. 

Updated: May 24, 2024, 05:14 PM IST
ऋतुजा बागवे झळकणार 'या' हिंदी मालिकेत; भूमिकेविषयी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा title=

मुंबई : स्टार प्लस आपल्या प्रोजेक्ट्सद्वारे  प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याची आपली परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर आणण्याकरिता सज्ज झाले आहेत. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे व अंकित गुप्ता मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. 'माटी से बंधी डोर' असे या मालिकेचे शिर्षक असून या मालिकेत ऋतुजा वैजयंती (वैजू)ची व्यक्तीरेखा साकारत आहे, तर अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. वैजूची नाळ जितकी आपल्या कुटुंबासोबत जोडलेली आहे तितकेच घट्ट नाते तिचे आपल्या गावाशीही आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत करुन या गावाचा कायापालट करायचा हे वैजूचे एकमेव लक्ष्य आहे.

नुकतेच मेकर्सनी या शोचा एक जबरदस्त प्रोमो रिलीज केला. यामध्ये प्रेक्षक वैजूला आपल्या स्वप्नातील राजकुमार रणविजयच्या भेटीसाठी प्रतिक्षा करताना पाहू शकतील. प्रेक्षकांना वैजू व रणविजय यांच्यात एक ड्रीम सिक्वेन्सही पहायला मिळेल, ज्यात वैजू रणविजयसोबत रोमँटिक क्षण घालविण्याचे स्वप्न पाहतेय. आपल्या अनोख्या अंदाजात ती रणविजयसोबत आपल्या भावी आयुष्याविषयी बोलते. रणविजयला मात्र तिचे हावभाव विचित्र वाटतात व तो तिला सांगतो की त्याला एका अशा मुलीची लग्न करायचे आहे जी शिकलेली असेल न की एखादी पैलवान. हे ऐकून वैजूचा ह्रदयभंग होतो. वैजू मात्र कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या भावना मोकळेपणाने व ईमानदारीने व्यक्त करते. आता वैजूसाठी पुढे काय लिहिले असेल? तिचे आपल्या स्वप्नातील या राजकुमारासोबत लग्न होईल का? आणि रणविजय तिचा प्रस्ताव स्वीकारेल का? हे पाहणे खूपच मनोरंजक ठरेल.

ऋतुजा बागवे आपल्या या मालिकेविषयी आणि प्रोमोविषयी म्हणते, "येत्या प्रोमोमध्ये दर्शक वैजूचे ड्रीम सिक्वेन्स पाहतील, जे वैजू व रणविजय यांच्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतील. वैजू ही सच्ची प्रामाणिक मुलगी आहे. त्यामुळे जेव्हा ती रणविजयशी बोलते तेव्हा त्याला ती त्याला कोणत्याही दृष्टीकोनातून शिष्ट वाटत नाही व तो सहजपणे तिला पैलवान म्हणतो. त्यामुळे तिला दु:ख होते. परंतु ऋतुजाला वैजूला सांगायचे आहे की तिने दु:खी होऊ नये व स्वत:प्रती कायम प्रामाणिक रहावे. कारण जगाला तिच्यासारख्या लोकांची गरज आहे जे ईमानदार असतील न की चालाख." 'माटी से बंधी डोर' ही मालिका येत्या २७ मे पासून स्टार प्लसवर दररोज सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे.