Marathi Actor Slams Sagar Barve: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना 'तुमचा पण दाभोलकर होणार' अशी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सागर बर्वे नावाच्या तरुणाला पुण्यातून अटक (Sagar Barve Arrested) केली आहे. सागर हा पुण्यामधील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. सागर बर्वेला अटक करण्यात आल्यानंतर अभिनेता किरण मानेनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून सागर बर्वेच 'नर्मदाबाई पटवर्धन' या फेक अकाऊंटमागे होता असं म्हटलं आहे. या सागर बर्वे नावाच्या तरुणाने आपल्यालाही पूर्वी ट्रोल केलं होतं असा दावा किरण माने यांनी केला आहे.
"सागर बर्वे, मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास! तुझं खरं नावं उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. 'नर्मदाबाई पटवर्धन' या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते," असं किरण माने यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच, "गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? पण आज तू तुरूंगात गेल्यामुळं शरमेनं मान खाली घालावी लागली की नाही बिचार्यांना? आजकालच्या 'फॅशन'नुसार काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव 'सागर' ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे," असा टोला किरण मानेंनी सागर बर्वेला लगावला आहे.
"अजूनही जागा हो माझ्या मित्रा. वेळ गेलेली नाही. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकीशी प्रतारणा करू नकोस. आपण सगळी माणसंच आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आपल्या मताशी न पटणारं कुणी बोललं की लगेच आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत. सहज आठवलं म्हणून सांगतो. 'बिगबाॅस सिझन चार' हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. त्याच टास्कमुळं कायम ओळखला जाईल. सगळ्या टास्कचा बाप - सी साॅ टास्क! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर - माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. नंतरच्या एका तासात बाकीचं अख्खं घर बाद झालं होतं. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं 'सत्व' हलवू शकत नाही," असं किरण माने म्हणाले आहेत.
"मला माहीतीये, सोशल मिडीयावर आपल्या विचारांशी फारकत असलेल्या कुठल्याही पोस्टवर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करून ट्रोल करणारे फक्त 8-10 लोक असतात. त्यांची शेकडो फेक अकाऊंटस् असतात. सेलिब्रिटींना बोलताना तर यांची भाषा आणखी नीच पातळी गाठते. कारण सेलिब्रिटी "कशाला उगाच वाद" म्हणून घाबरून पोस्ट डिलीट करतात. पण यांना घाबरायचं कारण नाही. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला 'रूतबा' कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं... शत्रूवर नजर रोखायची...आणि गालातल्या गालात हसायचं.. 'पठाण' मधल्या शाहरूखसारखं. क्यों की हमारी ताकत हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलती है!" या फिल्मी डायलॉगसहीत किरण मानेंनी आपली पोस्ट संपवली आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वेला पुण्यात अटक करून मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासानुसार सागर बर्वे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. मात्र, त्याने शरद पवारांना दिलेल्या धमकीच्या कृत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.