मुंबई : सलमान खानने आजवर बऱ्याच नवोदित अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मुख्य म्हणजे त्याच्यासोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अनेक अभिनेत्री या बॉलिवूडमध्ये यशशिखरावर आहेत. पण, एक अभिनेत्री अशीही होती, जी सलमानसोबत एका चित्रपटातून झळकल्यानंतर फार काही चमकली नाही.
राजघराण्याशी नातं असणारी ही अभिनेत्री आहे, भाग्यश्री. 'मैने प्यार किया', या चित्रपटातून ती झळकली होती. सांगलीतील एका राजघराण्यात तिचा जन्म झाला होता. तिचे वडील विजयसिंह राव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे महाराज होते. १९८९मध्ये तिने सलमानसोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळाली. पुढे भाग्यश्रीने १९९० या वर्षात हिमालयसह विवाहबंधनात अडकल्यानंतर मोठमोठ्या चित्रपटांना नकार दिला. लग्नानंतर ती फक्त तीन चित्रपटांतूनच झळकली.
हिमालय आणि भाग्यश्री यांच्या नात्याला तिच्या कुटुंबीयांचा नकार होता. त्यामुळे मग आपलं घर सोडून, विरोध पत्करून भाग्यश्रीने हिमालयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. असं म्हटलं जातं की, काही मित्रपरिवार आणि खुद्द सलमान खान यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आणि हिमालयने लग्नगाठ बांधली. कुटुंब आणि मुलाची जबाबदारी आपल्यावर येताच भाग्यश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत कलाविश्वाला रामराम ठोकला. आपल्या या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नसल्याचं म्हणत आज जेव्हा कुटुंबाकडे पाहते तेव्हा मला प्रचंड गर्व वाटतो, असंही भाग्यश्री सांगते.
वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'
भाग्यश्री चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या मुलानेही सध्या बॉलिवूडचीच वाट धरली आहे. काही दिवसांपूर्वीच गुवाहाटी येथे पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) म्हणूनही गौरवण्यात आलं.