Salman Khan : बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता संपूर्ण बॉलिवूड जगतात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. खुद्द सलमान खानही सध्या या सर्व परिस्थितीमध्ये आव्हानात्मक दिवसांना सामोरा जाताना दिसत आहे. बॉलिवूड वर्तुळातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Insiders च्या माहितीनुसार 'बिग बॉस 18' च्या चित्रीकरणादरम्यान सलमानच्या वर्तणुकीमध्ये दिसून आलेल्या बदलांमुळं अनेकांच्याच चिंतेत भर पडली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तातडीनं सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या घटनेआधी त्याच्याकडे Y दर्जाची सुरक्षा होती, आता यात वाढ करत त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.
सलमानला सातत्यानं बिष्णोई गँगकडून धमक्या येत आहेत, ज्यामुळं त्याच्या मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होत असल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'च्या चित्रीकरणादरम्यानही त्याच्या अवतीभोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा पाहायला मिळाला खरा, पण सलमानच्या चेहऱ्यावर असणारी चिंता काही त्याला लपवता आली नाही. यामागोमागच आता असंही म्हटलं जात आहे की, रोहित शेट्टीनं सलमानची अवस्था पाहता त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण लांबणीवर टाकलं आहे. इतकंच नव्हे, तर 'सिकंदर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सलमानच्या मानसिक आरोग्याच्या अनुषंगानंच हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमानच्याच निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार जीवे मारण्याच्या धमकीसत्रामुळं सलमाननं कामाच्या वेळापत्रकात बदल करत काही बेत रद्द केले आहेत. काही दिवसांसाठी सलमानला त्याच्या कामापासून वेळ काढत स्वत:ला वेळ द्यावा लागणार आहे. सलमानच्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना पाहता सध्या तो अतिशय आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये सुरु असणारा संघर्ष मागील अनेक दिवसांपासून धुमसत होता. पण, सध्या मात्र हा संघर्ष विकोपास गेल्याचं चित्र आहे. त्यातूनच सातत्यानं येणाऱ्या धमक्या पाहता अभिनेत्यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचं म्हटलं जात आहे.