प्रदर्शनापूर्वीच सलमानचा दबंग-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

 हिंदू जनजागृती संघटनेचा विरोध 

Updated: Dec 8, 2019, 05:19 PM IST
प्रदर्शनापूर्वीच सलमानचा दबंग-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'दबंग 3' हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात साधू-संतांना नृत्य करताना दाखवल्यानं हिंदू जनजागृती संघटनेने सिनेमाविरोधात आंदोलन केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा सलमान खानचा सिनेमा चर्चेत आला आहे. 

सलमान खानचा आगामी दबंग-३ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. हिंदू जनजागृती संघटनेनं या चित्रपटाच्या विरोधात दादर येथे प्रदर्शन केलं आहे. 'दबंग 3' च्या 'हूड दबंग दबंग' या गाण्यावरुनच वादाला सुरुवात झाली आहे. या गाण्यामध्ये साधूंना नाचताना दाखवण्यात आलंय. गिटार आणि इतर वाद्य हातात घेऊन आणि उड्या मारुन नाचताना साधू दाखवण्यात आले आहे. याविरोधात  हिंदु जनजागृति संघटनेनं मुंबईत दादरमध्ये निदर्शनं केली.

 दबंग सिनेमामधल्या गाण्यात साधूंना नाचताना दाखवल्यामुळे हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात सेन्सॉर बोर्डालाही निवेदन देण्यात आलं आहे. हिंदु जनजागृति संघटनेनं घेतलेल्या या आक्षेपावर दबंग टीमकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी दंबगमधल्या 'मुन्नी बदनाम हुई' वरुन आणि 'झंडुबाम'वरुनही वाद झाले होते. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला दबंग 3 सिनेमा २० डिसेंबरला   रिलीज होत आहे.  

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सिनेमात तुम्ही संताचा असा अवमान करताय, ही गोष्ट आम्ही स्वीकारू शकत नाही. याकरता आम्ही सेन्सॉर बोर्ड आणि सिनेमाचे दिग्दर्शक यांच्याकडे मागणी केली आहे. साधू संतांच्या आणि देवांच्या नृत्याचे व्हिडिओ काढून टाकावेत. आणि त्यांचा असा अवमान होणार नाही अशा प्रकारे हिंदूना आश्वस्त करावे. हे चित्र जर वगळले नाही तर संपूर्ण हिंदू समाज दबंग 3 या सिनेमाचा बहिष्कार करेल. आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटल्याशिवाय राहणार नाही, असं हिन्दू जनजागृति मंचाचे प्रवक्ता अरविंद पानसारे यांनी म्हटलं आहे.