मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 'धुरळा' (Dhurala) उठत असताना सोशल मीडियावर आणखी एका 'धुरळा'ची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक समिर विद्वांसच्या(Sameer Vidwans) 'धुरळा' या आगामी सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून नवा ट्रेंड सुरू केला होता. हा ट्रेंड 'धुरळा' या सिनेमाचा असून #पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन या सिनेमाची आहे. मराठीतील 9 कलाकार आणि 1 सिनेमा अशी या सिनेमाची खासियत आहे.
सिनेमात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, प्रियदर्शन जाधव, उमेश कामत आणि अल्का कुबल अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात आहे. सिनेमाचा पहिला लूक म्हणजे टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 3 जानेवारी 2020 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून क्षितीज पटवर्धनने या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आला अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. सर्व राजकीय पक्षांमधला सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाचा 'धुरळा' उठला असताना आता सिनेमातही असाच काहीसा 'धुरळा' पाहता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सिनेमातील व्यक्तींनी #पोटनिवडणूक असा ट्रेंड सुरू केला होता. या ट्रेंडमुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा संभ्रम झाला होता की, महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक होणार असल्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी या हॅशटॅगवर आणि मराठी कलाकारांवर नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र अखेर कलाकारांनी गुलदस्त्यात ठेवलेल्या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे.