Satish Kaushik : बॉलिवुड (Bollywood) अभिनेते आणि चित्रपट निर्मात सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कौशिक यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचे बुधवारी वयाच्या 66 व्या वर्षी दिल्ली (Delhi) येथे अचानक निधन झाले. सतीश कौशिक होळीच्या (Holi) सणानिमित्त दिल्लीत गेले होते. फार्महाऊसवर (Farmhouse) त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
मात्र आता सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करत नवी माहिती समोर आणली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिकचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही 'आक्षेपार्ह औषधे' सापडली आहेत. सध्या दिल्ली पोलीस या मृत्यूमागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
आक्षेपार्ह औषधांची पाकिटे कोणासाठी?
दिल्लीतील एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर या होळी पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादीही तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात फॉर्म हाऊसमध्ये सापडलेली आक्षेपार्ह औषधांची पाकिटे कोणासाठी आणि कशासाठी आणली होती, याचाही शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, गुरुवारी दिल्लीतील डीडीयू रुग्णालयात कौशिक यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंबईला नेण्यात आला आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश कौशिक यांना निरोप देण्यासाठी सलमान खान, अनुपम खेर, जावेद अख्तर, रणबीर कपूर यांच्यासह बी-टाऊनचे सर्व स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते. पण आता दिल्ली पोलीस आता सतीश कौशिक यांच्या पोस्टमॉर्टमच्या तपशीलवार अहवालाची वाट पाहत आहेत.