नवी दिल्ली : 'भाभी जी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hain), या मालिकेतील अनेक पात्रांना प्रेक्षकांनी कायमच भरभरुन प्रेम दिलं आहे. भाषा, विनोदी शैली आणि अतिशय दमदार अभिनय करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. याच कलाकारांमधील एक चेहरा 2015 पासून प्रेक्षकांनी जोडला गेला आहे. हा चेहरा आहे सानंद वर्मा, अर्थात अनोखेलालचा.
सानंदला या भूमिकेमुळं कमालीचं प्रेम मिळालं आहे. पण, इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवस फारसा सोपा नव्हता. एका मुलाखतीत सानंदनं आपल्या प्रवासाची माहिती दिली. 'मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी आपली ओळख तयार करणं सोपं नव्हतं. मुंबईत आलो त्यावेळी माझ्याकडे अवघे 100 रुपये होते. तेव्हा नेमकं काय करावं हेच कळत नव्हतं. मी त्या परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना केला. या शहरातील पहिलीच रात्र मी औषधांच्या कारखान्यात घालवली होती. तिथं झोपायलाही पुरेशी जागा नव्हती. मी कसाबसा तेथे झोपलो. माझ्याकडे खाण्यासाठीचेही पैसे नव्हते. बऱ्याच संघर्षानंतर मला एका एमएनसीमध्ये नोकरी मिळाली होती. तिथे मला चांगला पगार होता, जीवनशैलीही चांगली होती. पण, अभिनेता होण्यासाठी मी हे सारंकाही सोडलं. या निर्णयाने मी पुन्हा होतो तिथेच पोहोचलो', असं सानंद म्हणाला.
एका मोठ्या घराची खरेदी केल्यामुळे माझे सारे पैसे, ग्रॅज्युटी वगैरे होम लोनमध्ये गेलं. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मला कारही विकावी लागली, असं म्हणत सानंदनं त्याच्या जीवनातील एका कठीम वळणाविषयी सांगितलं. एकेकाळी आलिशान जीवनशैली असणाऱ्या सानंदच्या आयुष्यात आलेले हे बदल त्याच्यासाठी कठीण होते. काही वेळा तर 50 किमी चालतही ऑडिशन्स देण्यासाठी तो गेला होता. जीवनातील ही आव्हानं पेलत अखेर त्यानं या कलाविश्वात वेगळी ओळख प्रस्थापित केली.
भाभी जी घर पर है, या मालिकेशिवाय तो 'मर्दानी', 'छिछोरे', 'पटाखा' आणि 'रेड' या चित्रपटांमध्येही झळकला आहे.