अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शुभम देडगे या मित्रासोबत असतेवेळीच तिचा अपघात झाला आणि यामध्येच या दोघांचाही मृत्यू झाला

Updated: Sep 22, 2021, 02:27 PM IST
अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोलिसांचा धक्कादायक खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिच्या अपघाती मृत्यूमुळं कलाविश्व पुरतं हादरलं आहे. शुभम देडगे या मित्रासोबत असतेवेळीच तिचा अपघात झाला आणि यामध्येच या दोघांचाही मृत्यू झाला. सोमवारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातावेळी त्यांची कार खाडीत जाऊन पडली. उत्तर गोव्यातील अरपोरा येथे हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. जेव्हा हे दोघंही गोव्यातील सुट्टीनंतर परतत होते. 

कार अपघातामुळं ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला असला तरीही त्यांच्या मृत्यूचं मुळ कारण हे गुदमरणं असल्याचं कळत आहे. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार ही दोघंही बुडणाऱ्या कारमधून बाहेर येण्यास असमर्थ होती. कार सेंट्रली लॉक असल्यामुळं त्यांना बाहेर येणं शक्य झालं नाही आणि तिथंच त्यांचा मृत्यू ओढावला. 

अंजुना पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुरज गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासातून कळत आहे की, चालकाचं वाहनावर असणारं नियंत्रण सुटलं आणि यामुळं अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि तिथून अपघातग्रस्त कारसह दोन्ही मृतदेह सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आले. 

पोलीस उप निरीक्षक अक्षय पार्सेकर (सदर प्रकरणी तपास करणारे) यांच्या माहितीनुसार ही दोघंही आदल्या रात्री क्लबमध्ये गेले असावेत. कारण, त्या दोघांच्याही मनगटावर बँड बांधलेले दिसले. 

काही दिवसांवरच या जोडीचा साखरपुडा येऊन ठेपला होता. त्याआधी ते दोघंही गोव्यामध्ये सुट्टीसाठी गेले होते. पण, तिथेच हा अपघात झाला आणि त्यांच्यावर काळानं घाला घातला. दोघांच्याही कुटुंबांवर या अपघातामुळं दु:खाची लाट पसरली असून, अनेकांना या घटनेनं धक्का बसला आहे.