अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'श्री राम भक्ती उत्सव' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

अयोध्येत राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरु असताना अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो व्हीडिओ पोस्ट करत आहेत. याचनिमित्ताने आता एक व्हिडीओ अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Updated: Jan 22, 2024, 01:23 PM IST
अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'श्री राम भक्ती उत्सव' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : रामायणाचे पुरस्कर्ते आणि गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रामकथा सांगत सनातन धर्माचे सार अधोरेखित करणारे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू, यांनी शेमारूच्या नव्या 'श्री राम भक्ती उत्सव' अल्बमचे नुकतेच प्रकाशन केले. अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यानिमित्ताने राम महिमा सांगणारा हा अल्बम शेमारूने जगभरातील रामभक्तांसाठी तयार केला आहे. हा् अल्बम शेमारू भक्तीच्या यूट्यूब चॅनेलसह आघाडीच्या सर्व संगीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

श्री राम भक्ती उत्सव अल्बमच्या प्रकाशन सोहोळ्याला रामचरित मानसमधील प्रभू श्रीरामांच्या कथा सांगणारे प्रख्यात रामकथा वाचक श्री. मोरारी बापू यांच्या उपस्थितीने एक वेगळेच आध्यात्मिक वलय प्राप्त झाले होते.

'श्री राम भक्ती उत्सव' अल्बममध्ये सुरेश वाडकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचीही भक्तीगीते आहेत. या अल्बमच्या माध्यमातून सचिन पिळगावकर प्रथमच भक्ती गीत गायक म्हणून समोर येत आहेत. याशिवाय या अल्बममध्ये अन्वेशा, दीपक पंडित, गोविंद प्रसन्न सरस्वती, साधो बँड, पृथ्वी गंधर्व, अवधेंदू शर्मा, जेजे व्याक यांचीही भक्तीगीते आहेत. 'श्री राम भक्ती उत्सव' अल्बम विष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामांना अर्पण करण्यात आलेला आहे. रामायण या महाकाव्यात प्रभू श्रीरामांच्या गुणांचे वर्ण करण्यात आले असून प्रभू श्रीराम शौर्य आणि सद्गुणाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत.

प्रभू श्रीरामांचे दैवत्व सर्व भौगोलिक सीमा पार करून संपूर्ण विश्वात पसरलेले आहे. आणि 'श्री राम भक्ती उत्सव' या संगीतमय मालिकेत प्रभू श्रीरामांची हीच महती संपूर्ण जगासमोर मांडण्यात आलेली आहे. यात रामलल्लांच्या जन्मगीतापासून सीता-राम विवाहापर्यंतची गाथा भक्तीगीतांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. पहाटेच्या 'रघुनन्दन सुप्रभातम'पासून संध्याकाळच्या अयोध्या आरतीपर्यंत, संक्षिप्त गीत रामायणापासून ते श्री राम स्तुतीपर्यंत असे सर्व काही या अल्बममध्ये आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील सर्व गोष्टींची माहिती असलेला हा अल्बम रामभक्तांसाठी हा एक अनमोल संगीतमय ठेवा आहे.जगातील सर्व वयोगटातील भक्तांना प्राचीन लोककथा, मंत्र आणि स्तोत्रांच्या माध्यमातून आध्यात्मिकतेने जोडण्याचा प्रयत्न शेमारू भक्तीने श्री राम भक्ती उत्सव या अल्बममध्ये केलेला आहे.