मुंबई : खेळाचं मैदान असो किंवा फॅशन शोचा रॅम्प, सगळीकडे हरियाणाच्या मुली बाजी मारताना दिसतायत. पुन्हा एकदा हरियाणाच्या मुलीने कमाल दाखवलीये. २८ वर्षीय श्वेता मेहता एमटीव्हीवर असणारा पॉप्युलर रिअॅलिटी शो 'रोडीज रायजिंग १४' ची विजेती बनलीये. गेल्या महिन्यातच मनुषी चिल्लर ही एफबीबी कलर्स फेमिना 'मिस इंडियाची विजेती बनली.
मनुषी चिल्लर ही एक मेडिकलची विदयार्थीनी तर श्वेता मेहता ही इंजिनियर आहे. फायनलमध्ये नेहा धूपियाच्या संघातील श्वेता मेहतासमोर प्रिंन्स नरूलाच्या संघातल्या बसीर अलीचे आव्हान होते. 'रोडीज' चा प्रवास हा झांसीपासून, ग्वालियर, आग्रा, अमरोहा आणि पानिपत ते कुरुक्षेत्रमध्ये संपला.
'रोडीज शोची विजेती मुलगीच असावी असे नेहा मॅमला वाटत होते. जेव्हा माझे नाव विजेती म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तसेच मी त्यांच्याकडून एक वचन घेतले होते की जर मी हा शो जिंकला तर त्यांच्या हेअर स्टायलिस्टकडून माझी हेअर स्टाईल केली जावी. अखेर मी हा शो जिंकले. आम्ही दोघांनी एकमेकांना दिलेले वचन पूर्ण केले,' असे श्वेताने एका मुलाखतीत सांगितले.
'रोडीज राइजिंग १४' ची विजेती बनल्यानंतर श्वेता म्हणाली, 'हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे आणि इथे पोहचण्यासाठी मला खूपच अडचणींचा सामना करावा लागला'.
फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये तिने आपली स्वत:ची ओळख बनवली आहे. २०१६ चा तिने फिटनेस मॉडेल चँपियनचा पुरस्कार ही मिळवलाय.