मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लॉकडाऊनच्या काळात मजुरांसाठी सोनू सूद 'देवदूत' ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे असंख्य मजुरांची गैरसोय झाली. यांच्यासाठी सोनू सूद धावून आला. सोनू सूद या मजुरांना त्यांच्या गावी पाठवत आहेत.
सोनू सूदच्या या मदतीमुळे सोनू सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. खऱ्या आयुष्यातही लोकं त्यांना खऱ्या हिरोचा दर्जा देऊ लागलेत. जो सोनू सूद मजुरांकरता लाखो रुपये खर्च करत आहे. तो जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे अवघे ५५०० रुपये होते.
एका मुलाखतीत सोनूने सांगितलं की, आपल्या करिअरची सुरूवात दिल्लीत मॉडेलिंग करून केली. मॉडेलिंगमधून काही पैसे जमा करायचे आणि मुंबईत स्ट्रगल करण्यासाठी यायचं. दिल्लीत दीडवर्ष अनेक शोमध्ये काम करून साडे पाच हजार जमवणं शक्य झालं होते. एवढ्या पैशातून एक महिना आपण काढू शकतो असं सोनू सूदला वाटल्यानंतर त्याने मुंबई गाठली. पण त्याचे हे पैसे अवघ्या ५-६ दिवसांतच संपले.
त्याचवेळी त्याला पहिला ब्रेक एका जाहिरातीकरता मिळाले. त्याकरता २००० प्रत्येक दिवसाचे मिळणार होते. सोनू सूदला वाटलं की या जाहिरातीतून मला फिल्म सिटीत प्रवेशपण मिळेल आणि लोकं मला ओळखतील. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की आणखी काही जण तेथे उपस्थित होते. त्या जाहिरातीमध्ये सोनू सूद मागे ड्रम वाजवत होता पण जाहिरात प्रदर्शित झाल्यावर तो दिसला देखील नाही.
सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याला वाटत होतं की, लोकांनी आपली मदत करावी. पण त्याला कुणीही अभिनेताही भेटत नव्हता. कुणीही भेटलं तरी तू अभिनेता बनायला आलास? असा प्रश्न विचारत असे. पण आता सोनू सूदला कुणी भेटायला आलं तर तो त्याला मोकळेपणाने भेटतो. तो कुणालाही निराश करत नाही.