विश्वविक्रम करणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड

जाणून घ्या त्यांच्या नावे असणाऱ्या विक्रमाविषयी

Updated: Jun 27, 2019, 08:42 AM IST
विश्वविक्रम करणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड  title=

हैदराबाद : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख असणाऱ्या विजया निर्मला यांचं बुधवारी निधन झालं. हैदराबादमध्ये कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा दोनशेहून अधिक चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. तर, जवळपास ४० चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

देशातील संपूर्ण चित्रपट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चांच्या वर्तुळात असणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत निर्मला यांच्या जाण्याने कायमची पोकळी निर्माण झाली आहे. 

तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये विजया निर्मला यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. पुढे त्या 'अल्लुरी सीतारामा राजू', 'मीना', 'पूला रंगादू', 'असाध्युडू', 'एन अन्नन', 'भार्गवी निलयम' अशा अनेक चित्रपटांतून मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. 

२००२ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावे एका विश्वविक्रमाचीही नोंद करण्यात आली होती. सर्वाधिक चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांच्या नावे हा विक्रम नोंदवण्यात आला होता.

निर्मला यांच्या निधनानंतर राजकीय आणि कलाविश्वातून अनेकांनीच शोक व्यक्त केला. उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनीही ट्विटरच्या माध्यमातून निर्मला यांना श्रद्धांजली वाहिली. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकारांनी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं.