मुंबई : Man vs Wild या अतिशय गाजलेल्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. या कार्यक्रमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलेलं असताना, बेअर ग्रिल्स Bear Grylls हासुद्धा तितक्याच झपाट्याने अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला. असा हा बेअर त्याच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून एका अशा चेहऱ्यासोबत झळकणार आहे, जो चेहरा कित्येकांसाठी पूजनीय आहे.
आपल्या अनोख्या आणि लक्षवेधी अंदाजासाठी ओळखला जाणारा हा चेहरा म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. थलैवा, म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत Bear Gryllsसोबत Man vs Wild या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या नव्या भागासाठी ते बंदीपूर व्याघ्र प्रकल्प अभयारण्यात चित्रीकरण करत आहेत.
बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाचे संचालक टी. बालचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून रजनीकांत या ठिकाणी आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत चित्रीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेअर या ठिकाणी मंगळवारी सकाळच्या सुमारास दाखल झाला. याविषयीची आणखी कोणती माहिती मात्र येऊ शकलेली नाही.
रजनीकांत यांची लोकप्रियता आणि थरारक अनुभवांसाठी चर्चेत असणारा बेअर ग्रिल्स हे दोघं एकत्र येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. बेअरसोबत रजनीकांत त्यांचा स्वॅग दाखवतात, की अनोख्या अंदाजात त्याचंही मन जिंकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.