SSR Case : मुलाला अटक होताच रियाच्या वडिलांकडून साऱ्या देशाचं अभिनंदन...

यापुढे अटक होणाऱ्यांमध्ये... 

Updated: Sep 6, 2020, 02:08 PM IST
SSR Case : मुलाला अटक होताच रियाच्या वडिलांकडून साऱ्या देशाचं अभिनंदन...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सुशांत सिंह राजपूत Sushant singh rajput या बॉलिवूड अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty आणि तिच्या कुटुंबीयांच्या पुढं आलेल्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. त्यातच या प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शनही आढळून आल्यामुळं एनसीबीनंही यामध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत रियाचा भाऊ Showik शोविक चक्रवर्ती याला ताब्यात घेण्यात आलं. ज्यावर आता त्याचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. उपरोधिक सूरात त्यांनी देशाचं अभिनंदन केलं. 

'साऱ्या देशाचं मी अभिनंदन करतो. तुम्ही माझ्या मुलाला अटक केली. मला खात्री आहे यापुढची अटक माझ्या मुलीची असेल त्यानंतर कोण, हे मला नक्की ठाऊक नाही. तुम्ही अतिशय परिणामकारकरित्या एक मध्यमवर्गीय कुटुंब उध्वस्त केलं आहे', असं म्हणत निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी नाराजीचा सूर आळवला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयकडून त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी धक्कादायकरित्या समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून शोविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली. याशिवाय सुशांतचा हाऊस मॅनेजर असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा यालाही ताब्यात घेण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणातील तपासाअंतर्गत ७ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

शुक्रवारी एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आणि सॅम्युअल मिरांडला चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीमध्ये सॅम्युअल मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केलं, असं एनसीबीने सांगितलं. एनसीबीने चौकशीनंतर शोविक आणि सॅम्युअलला अटक केली.