नाटकाच्या प्रयोगादरम्यान खणाणणारा मोबाईल ठरतोय 'या' कलाकारांची डोकेदुखी

त्यांनी याविषयी तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली आहे.   

Updated: Jul 31, 2019, 09:37 AM IST
नाटकाच्या प्रयोगादरम्यान खणाणणारा मोबाईल ठरतोय 'या' कलाकारांची डोकेदुखी

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : नाटकाची तिसरी घंटा वाजली की पडदा उघडतो आणि कलाकारांची रंगमंचावर एन्ट्री होते. प्रयोग सुरू होतो. मात्र नाटकाचा हा प्रयोग सुरू झाल्यानंतर अलीकडे कलाकारांना एक चिंता सतावू लागली आहे. ती चिंता आहे प्रेक्षकांच्या मोबाईलची. प्रयोग सुरू असताना अचानकपणे मोबाईलची वाजणारी रिंगटोन कलाकारांची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे सध्या नाट्यविश्वात मोठीच चर्चा सुरू झाली आहे. 

कलाकारांना सतावणाऱ्या या अडचणीवर उपाय तरी काय ? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण फक्त दोन-तीन प्रेक्षकांच्या अशा बेजबाबदार वागण्याने संपूर्ण नाटकाच्या रंगाचा बेरंग होऊ लागला आहे. 

एखाद्या नाट्यगृहामध्ये नाटक रंगात आलं असेल, कलाकार नाटकात रंगून गेले असतील, तर नेमक्या अशाच वेळी प्रेक्षकांमधून मोबाईलच्या रिंगटोनचा आवज आला तर कलाकारांचा संताप होण साहाजिक आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सुमित राघवन सुबोध भावे पाठोपाठ आता अशोक सराफ यांनीही याबाबात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मोबाईलची रिंगटोन का ठरते कलाकारांची डोकेदुखी?

रविंद्र नाट्यमंदिरमध्ये नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून अशीच मोबाईलची रिंगटोन वाजली आणि त्याच्याच पुढच्या क्षणाला अभिनेता सुबोध भावेचा संताप झाला. नाटक सुरु असताना मोबाईलवर बोलणारे प्रेक्षकही काही कमी नाहीत.
असे प्रकार पाहून कलाकारांनी आता नाटक करणं सोडून द्यावं अशी संतापजनक प्रतिक्रिया सुबोध भावेनं व्यक्त केली. यावर उपाय म्हणून आता सुबोध भावेने नाटक सुरू होण्यापूर्वी थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलची रिंगटोन सायलेंट मोडवर ठेवावी, अशी विनंती वजा सूचनाच देणंच सुरू केलं आहे. 

 

कमीअधिक प्रमाणात सर्वच कलाकरांना हाच अनुभव येतो आहे..

अशोक सराफ, निर्मिती सावंत, सीमा देशमुख, मधुरा वेलणकर अशा कलाकारांनी आणि दिलीप जाधव, दिनू पेडणेकर अशा निर्मात्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे.  प्रयोग सुरू असताना मोबाईलची रिंगटोन वाजली की नाटकामध्ये एकरुप झालेल्या कलाकारांची एकाग्रता भंग पावते आणि उत्साहावर पाणी पडण्याची शक्यता असते, असं अभिनेता अशोक सराफ यांनी म्हटलंय. नाटक हे कलाकार आणि प्रेक्षक यांनी मिळून यशस्वी करण्याची कलाकृती आहे, त्यामुळे अशा मोबाईलधारी प्रेक्षकांनी गंभीरपणे यावर विचार करण्याची गरज असल्याचं अशोक सराफ यांनी म्हटलं. याबाबत खरंतर केवळ कलाकारच हैराण होतात असं नाही, तर  बहुतांश प्रेक्षकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. 

मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणारे प्रेक्षक हे इतर प्रेक्षकांचा रसभंग करत आहेत याची जराशीही फिकीर नसणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. एकूणच काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यानेदेखील हाच मुद्दा प्रकर्षानं मांडला होता. खरंतरं अशा घटनांना दोन-तीन 'मान्यवर' प्रेक्षकच कारणीभूत ठरतात. ज्यामुळे सगळ्य़ांचीच निराशा होते. ही मान्यवर प्रेक्षकांची यादी आणखी लांबण्यापूर्वीच यावर आता जालिम उपाय करण्याची अंत्यत आवश्यकता आहे.