मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या अनेक कुलूपबंद असलेल्या विषयांवर चर्चा सुरू झाली. सुशांत सिंह राजपूत हा नेपोटिझमचा (Nepotism) शिकार बनला या विषयावर अनेक कलाकारांनी आपली ठाम मत सोशल मीडियावर शेअर केली. असं म्हटलं जातं की, सुशांतला बॉलिवूडमध्ये त्याची जागा दिली गेली नाही. त्याला सतत ठरवून डावलण्यात आलं. याच नैराश्यामुळे त्याना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
या सगळ्याचा थेट परिणाम हा बॉलिवूडमधील कलाकारांच्या सोशल मीडियावर थेट पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील या तणावाच्या वातावरणात काही कलाकारांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये कमालीने वाढ झाली आहे. तर काहींच्या लोकप्रियतेवर परिणाम झाल्यामुळे त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने कमी झाले आहे.
फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून फॉलोअर्सने जी व्यक्ती सिनेजगतात नेपोटीझमला महत्व देते त्या व्यक्ती अनफॉलो करण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी संध्याकाळपर्यंत याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री कंगना रानावतच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २ मिलियनवरून हे फॉलोअर्स ३.२ मिलियनपर्यंत पोहोचले असून हा आकडा वाढतच आहे. तर करण जोहरच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये घट झालेली पाहायला मिळते. इंस्टाग्रामवर ११ मिलियन फॉलोअर्सचा आकडा अगदी २० मिनिटांत कमी होऊन १०.९ मिलियनपर्यंत पोहोचला आहे. या आकड्यात झपाट्याने बदल होत आहेत. तुम्ही हे वृत्त वाचेपर्यंत या आकड्यात नक्कीच बदल झालेला असेल.
अभिनेत्री कंगना रानावत अनेकदा काही मुद्यांवर स्पष्टपणे बोलते. कंगना ही पहिली अशी व्यक्ती आहे जी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात येऊन नेपोटिझमवर बोलली. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये तिने सुशांतच्या आत्महत्येवर आणि तो करा बॉलिवूडमध्ये बाहेरचा आहे हे दाखवून दिलं गेलं यावर भाष्य केलं आहे.
अनेकांनी तर ऑनलाईन पिटिशयन दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये स्टार किड्सच्या सिनेमांना बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी यामध्ये करण जोहर आणि खान कुटुंबियांच्या मुलांचा समावेश केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ३४ वर्षांच्या सुशांतने नैराश्यात येऊन आत्महत्या केल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे.