Dinosaur Highway : जगात डायनासोरसारख्या प्रचंड महाकाय प्राण्याचं अस्तित्वं होतं हे सांगणारे अनेक संदर्भ आजवर आपण ऐकले आणि पाहिले आहेत. प्रत्यक्षात हे संदर्भ जेव्हाजेव्हा समोर आले तेव्हातेव्हा थक्कच व्हायला झालं. कारण, कैक वर्षांपूर्वी पृथ्वीवर नेमकी कोणत्या प्रकारची जीवसृष्टी होती हे पाहणं स्वाभाविकपणेच अतिशय थरारक. असंच एक अनपेक्षित आणि काहीसं थरारक संशोधन पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. जिथं, चक्क डायनासोरच्या पावलांचे एका रांगेत दिसणारे ठसे अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर ज्या क्षणी या पावलांच्या ठस्यांविषयीची माहिती देण्यात आली तेव्हा नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आपल्याला आता प्रत्यक्षात 'ज्युरासिक वर्ल्ड' अनुभवायला मिळतं की काय, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या, तर काहींनी या चित्रपटातील शॉर्ट व्हिडीओ शेअर करत या बातमीवर प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडमधील दक्षिणेकडे असणाऱ्या एका चुनखडकाच्या खाणीमध्ये मातीत खोदकाम करताना एका मजुराला अचानकच अनपेक्षित उंचवटे जाणवू लागले आणि याच एका शंकेनं जगासमोर आला “Dinosaur Highway”. डायनासोरच्या वावरण्याचे साधारण 200 मार्ग इथं उत्खननातून समोर आले आणि हे सर्व अवशेष 166 मिलियन वर्षांपूर्वीचे अर्थात 166000000 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
जवळपास 100 हून अधिक पुरातत्वं विभाग कर्मचाऱ्यांनी या भागामध्ये खोदकाम करत हे अवशेष शोधून काढले. ज्यामुळं आता ज्युरासिक काळात जग, जीवसृष्टी नेमकी कशी होती, डायनासोर नेमके कसे वावरत होते याचा अंदाज लावता येत आहे. समोर आलेले पायांचे ठसे हे Cetiosaurus प्रजातीच्या डायनासोरचे असल्याचं सांगितलं जात आहे. अतिशय मोठ्या आकाराचे, लांबलचक मान असणारे, साधारण 60 फूट उंची असणारे हे डायनासोर या भागात कधी एकेकाळी वावरत असल्याचा तर्क लावला जात आहे.
NEW: In a stunning find, researchers from Oxford University and @unibirmingham have uncovered a huge expanse of quarry floor filled with hundreds of different dinosaur footprints, creating multiple enormous trackways. pic.twitter.com/8ZF590BVIi
— University of Oxford (@UniofOxford) January 2, 2025
डायनासोरच्या पावलांचे ठसे समोर येण्याची ही पहिलीच वेळ नसून, 30 ते 40 वर्षांपूर्वी अशाच चिन्हांनी जगाचं लक्ष वेधलं होतं. पण, त्या संशोधनातील बहुतांश भागामध्ये आज पोहोचता येत नाही. शिवाय त्याचे फारसे पुरावे अस्तित्वात नाहीत. त्यामुळं आता मात्र सापडेलले हे पुरावे शक्य त्या सर्व परिंनी जतन करत त्याचं निरीक्षण आणि अध्ययन केलं जात असल्याचं या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्यांनी सांगितलं आहे.