मुंबई : टीव्हीचा सर्वात आवडता कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेता राज अनादकटबद्दल बऱ्याच दिवसापासून चर्चा होत आहे. तो लवकरच शो सोडणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. प्रॉडक्शन हाऊसमधील काही मतभेदांमुळे राज यांनी हा निर्णय घेतल्याचे वृत्त होतं.
20 डिसेंबर रोजी त्याचा शूटिंगचा शेवटचा दिवस असणार होता. त्यामुळे या बातमीने चाहते ही थोडे निराश झाले होते, पण आता त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
रिपोर्ट्सनुसार, राजने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि मेकर्सने सुद्धा तो शो सोडणार नसल्याचा खुलासा केला आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या एका सूत्राने सांगितले की, राज अनादकट काही गोष्टींमुळे खूश नव्हते, पण तो वेळ निघून गेला आहे आणि आता तो शोमध्ये राहण्याचा विचार करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही महिन्यांपूर्वी अशी अफवा पसरली होती की मुनमुन दत्ता शो सोडणार आहे कारण एका व्हिडिओमध्ये वादाग्रस्त वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर खूप ट्रोल होत होती.
पण तिने शोचे शूटिंग सुरूच ठेवले होते. काही काळापूर्वी मुनमुन आणि राजच्या अफेअरच्या बातम्याही मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की या कारणामुळे तो शो पुढे चालू ठेवू इच्छित नाही.
आता सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, 'राज यांनी प्रॉडक्शन हाऊससमोर आपले विचार मांडले. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
राजचे 'टप्पू' हे पात्र लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच शो सोडणे हा विनोद नाही. त्याला इतर काही समस्या असतील तर त्या देखील सोडवल्या जातील.