Tabu On Ajay Devgn Offering Drop: मोठ्या पडद्यावर भारतीय चाहत्यांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अशा जोड्या पाहिल्या आहेत ज्यांच्या अभिनयाने चाहते भारावून गेले. यामध्येच अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांच्या जोडीचाही समावेश होतो. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्टी चाहत्यांना चांगलीच भावली आहे. मात्र खऱ्या आयुष्यामध्येही या दोघांची मैत्री मागील अनेक दशकांपासूनच आहे. आपल्या याच मैत्रीसंदर्भात बोलताना तब्बूने एक रंजक किस्सा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
तब्बूने 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, माझी आणि अजय देवगणची मैत्री चित्रपटाच्या सेटवर सुरु झालेली नाही असं सांगितलं. सेटवर मैत्री न झाल्यामुळेच आमची मैत्री एवढ्या दिर्घकाळ टिकून आहे, असं तब्बूने सांगितलं. अजय देवगण हा तब्बूच्या भावाचा मित्र आहे. त्यामुळेच तब्बू आणि अजय देवगण एकमेकांना अगदी तरुण वयापासून एकमेकांना ओळखतात.
तरुणपणीची आपली आठवण सांगताना तब्बूने अजय देवगणच्या कार चालवण्याच्या सवीयबद्दल भाष्य केलं आहे. अजय देवगणला वेगाने गाडी चालवायला आवडतं. अजूनही त्याला त्याच्या ड्रायव्हींग स्किल्स दाखवायच्या असतात असं तब्बू म्हणाली. "तो अजिबात बदललेला नाही. आधी तो ओपन जीपमधून प्रवास करायचा आता तो अशी गाडी वापरत नाही एवढाच फरक आहे. मात्र तो ज्या वेगाने गाडी चालवतो तो त्याने कायम राखला आहे," असं तब्बू अजयच्या ड्रायव्हिंगबद्दल म्हणाली. तब्बूचं हे बोलणं ऐकून अजयने आपण फार बदलल्याचं सांगितलं. मात्र तब्बूने यावर अजयबरोबरचा एक अनुभव मुलाखतीत सांगितला.
अजय एवढ्या वेगाने गाडी चालवतो की त्याच्या कारमध्ये बसताना आपल्याला भिती वाटते असं तब्बू म्हणाली. तब्बूने अजय कशाप्रकारे वेगाने गाडी चालवायला सांगतो याबद्दल बोलताना, "आजही तो कारने ड्रॉप करण्याची ऑफर देतो तेव्हा मला त्याच्या कारमध्ये बसायला भिती वाटते कारण तो फार वेगाने गाडी चालवतो. एकदा त्याने माझी कार थांबवली होती आणि तो कार ड्रायव्हरला, 'बैलगाडी चालवतोयस का? वेगात चालव. माझी गाडी तुमच्या गाडीच्या मागे आहे,' असं म्हणाला होता," असं सांगितलं. यावरुन अजयने स्वत:ची बाजू मांडताना, "मी हे नाकारणार नाही. जेव्हा तुम्ही 18-19 वयाचे असता तेव्हा तुम्ही आयुष्याकडे एका विशेष दृष्टीकोनातून पाहतो. त्यानंतर आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलत जातात. हे सर्वांबरोबरच होतं," असं म्हटलं.
अजय देवगण आणि तब्बू एकमेकांना 90 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ओळखतात. दोघे पहिल्यांदा 1994 साली 'विजयपथ' चित्रपटातून एकत्र झळकले होते. त्यानंतर दोघांनी 'हकीकत', 'ठकसेन', 'दृष्यम', 'गोलमाल अगेन', 'दे दे प्यार दे', 'दृष्यम-2'मध्ये एकत्र काम केलं आहे. आता या दोघांचा 'औरे मे कहाँ दम था' चित्रपटात एकत्र झळकणार असून हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.