मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं 2008 या वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा विडा उचलला आणि त्या क्षणापासून आतापर्यंत हे सत्र अविरतपणे सुरुच आहे. रोजच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग घेत त्यांना काल्पनिक पात्रांशी जोडत मालिकेच्या स्वरुपात सादर करणं म्हणजे मोठी जबाबदारीच. (tarak mehta ka ulta chashma)
पण, या मालिकेच्या संपूर्ण टीमनं ही जबाबदारी तिततक्याच लिलया पेलली. अभिनेता दिलीप जोशी यांनी या मालिकेमध्ये जेठालाल गडा ही भूमिका साकारली.
जोशी यांनी साकारलेल्या जेठालालला प्रत्येकानंच आपल्या मनात आणि कुटुंबात खास जागा दिली, पण या पात्रासाठी कोणा दुसऱ्याच्याच नावाला पसंती होती असं सांगितल्यास? विश्वास बसेल ?
सूत्रांच्या माहितीनुसार या भूमिकेसाठी दिलीप जोशी नव्हे, तर अभिनेता राजपाल यादव याला पहिली पसंती देण्यात आली होती. पुढे मग ही भूमिका दिलीप जोशी यांना मिळाली आणि मग जे घडलं त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार.
का नाकारली भूमिका?
आपण जेठालालची भूमिका नेमकी का नाकारली या प्रश्नाचं उत्तर राजपाल यादव यानं एका मुलाखतीत दिलं होतं. मला अशी एखादी भूमिका साकारायला आवडेल जी खास माझ्यासाठीच लिहिलेली असेल. कोणा दुसऱ्यासाठी आखण्यात आलेल्या गोष्टींमध्ये मी स्वत:ला पाहू इच्छित नाही, असं तो म्हणाला होता.
एकिकडे राजपाल यादव यानं ही मालिका नाकारली आणि याच मालिकेनं दिलीप जोशींना मात्र कमालीची लोकप्रियता आणि आर्थिक पाठबळ दिलं. मालिका सुरु होण्यापूर्वी वर्षभरासाठी जोशी बेरोजगार होते. पण, अखेर मात्र त्यांच्या नशिबात असलेलं कोणीही हिरावून घेऊ शकलं नाही.