The Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Updated: Mar 13, 2022, 09:17 PM IST
The Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक title=

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय गुजरात सरकारने रविवारी घेतला. यासोबतच भाजपच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारने काश्मीरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे आणि झी स्टुडिओजची निर्मिती आहे.

हा चित्रपट पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून काश्मिरी हिंदू समुदायाच्या लोकांच्या लक्ष्यित हत्येनंतर खोऱ्यातून समुदायाच्या लोकांच्या पलायनावर आधारित आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी ट्विट केले, "द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात 1990 च्या दशकात काश्मिरी हिंदूंना झालेल्या वेदना, संघर्ष आणि मानसिक आघात यावर हृदय हेलावून टाकणारे वर्णन केले आहे.

'अधिकाधिक लोकांनी चित्रपट पाहावा'

ते पुढे म्हणाले, 'हा सिनेमा अधिकाधिक लोकांनी पाहण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही मध्य प्रदेशात सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.' 

या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आहेत. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चौहान यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याचे अभिनंदनही केले आहे.