मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. दिववसेंदिवस या मालिकेच्या प्रेक्षक वर्गात वाढ होताना दिसून आलं आहे. राणादा आणि अंजलीबाईंचा सुरेख प्रवास नेहमीच टप्प्याटप्प्यानं रंजक वळणावर येताना आपण सर्वांनी पाहिलाय.
गेल्या ३ वर्षांपासून कोल्हापुरातील 'वसगडे' या छोट्याशा गावात मालिकेचं चित्रीकरण होत आलं आहे. मालिकेनं आता चौथ्या वर्षात पदार्पण केल असून नवीन ठिकाणी मालिकेचं चित्रीकरण होत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताला मालिकेच्या चित्रीकरणाचं ठिकाण बदललं आहे. कोल्हापुरातल्या 'केर्ली' गावात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका नवीन बंगल्यात आता राणादा आणि अंजलीबाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंजली आणि राणादाचं नवीन बंगल्यात शिफ्टिंग झाल्यानंतर दोघेही जुन्या वाड्याला मिस करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'तुझ्यात जीव रंगला'मध्ये गायकवाडांचा वाडा अतिशय महत्त्वाचा भाग दाखवण्यात आला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून या वाड्यात घडलेल्या अनेक घडामोडी सर्वांनीच पाहिल्या आहेत. या वाड्याशी कलाकारांप्रमाणे प्रेक्षकही नकळतपणे जोडले गेले आहेत. मात्र आता 'तुझ्यात जीव रंगला'चं चित्रीकरण स्थळ बदललं आहे. पण आता राणा-अंजलीने तो वाडा का सोडला, राणादा-अंजली नव्या बंगाल्यात शिफ्ट का झाले हे पाहणं मात्र औस्तुक्याचं ठरणार आहे.