मुंबई : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या चित्रपटाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी 'पंचक'च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे.
'पंचक'च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर ?' हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या गोंधळात घरात सर्कस होत आहे, ऑपेराही होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे, याचे उत्तर प्रेक्षकांना ५ जानेवारी रोजी मिळणार आहे. कथा, दिग्दर्शन, कलाकार, संगीत या सगळ्याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
चित्रपटाबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, '' या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह बाबींमध्ये मी विशेष लक्ष घातले आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येकाची निवड ही योग्य आहे. चित्रपट पाहताना याचा प्रत्यय प्रेक्षकांनाही नक्कीच येईल. प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या परंतु आज जेव्हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा मनाला समाधान मिळतेय. मला खात्री आहे, चित्रपटावर प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रेम करतील.''
तर 'पंचक'च्या निर्मितीबद्दल डॉ. श्रीराम नेने म्हणतात, ''ज्या वेळी आम्ही या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हाच आम्ही निर्णय घेतला हा चित्रपट करायचाच. चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनसाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही सगळ्यांनीच ही प्रोसेस एन्जॉय केली. आता आमचे हे एक कुटुंब बनले आहे. मी सुद्धा या चित्रपटाकडून, कलाकारांकडून बरंच काही शिकलो.''