'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान

Santosh Deshmukh Murder Gujrat Connection: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील गुजरात कनेक्शन दोन मुख्य आरोपींच्या अटकेनंतर समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 02:38 PM IST
'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान title=
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोंदवलं मत (फाइल फोटो)

Santosh Deshmukh Murder Gujrat Connection: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळेंना 26 दिवसानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणामागील गुजरात कनेक्शन समोर आलं आहे. या आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन आता समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

गुजरात कनेक्शन काय?

देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी मोहिमेच्या उद्घाटनासाठी नागपूरमध्ये होते. याचवेळी त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना काही प्रश्न विचारण्यात आला. काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही हत्या केल्यानंतर गुजरातला पळून गेले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. हे दोघेही गुजरातमधील एका मंदिरात वास्तव्यास होते. मात्र पैसे संपत आल्याने ते पुण्यात आले असता त्यांना अटक झाली. या प्रकरणात तपास सुरु असून या प्रकराशी संबंधित इतर अनेक पैलूही चर्चेत आहेत. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना या प्रकरणावर बोलल्याने धमकावलं जात असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. त्यामुळेच हे प्रकरण चर्चेत असतानाच या सर्व गोष्टींवर फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

मोर्च्यांवरही नोंदवली प्रतिक्रिया

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघत असलेल्या मोर्चांसंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, "मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत कोणालाही वाचवलं जाणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने दादागिरी, हप्ते वसुली करतात त्या सगळ्यांवर जरब बसवणार," असंही फडणवीस म्हणाले. 

दमानियांना आलेल्या धमक्यांवर काय म्हणाले?

अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समर्थकांकडून आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप केल्यासंदर्भात फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांना द्यावी.. पोलीस त्याच्यावर कारवाई करतील," असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे. 

नक्की वाचा >> 'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

सरपंच हत्येच्या गुजरात कनेक्शनवर फडणवीसांची प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सरपंचांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातून गुजरातला पळून गेले होते आणि 3 तारखेपर्यंत तिथेच लपले होते, अशी माहिती समोर आली आहे. याच राज्याला हादरवून सोडणाऱ्य सरपंच हत्या प्रकरणाच्या गुजरात कनेक्शनबद्दल पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर फडणवीसांनी, "(आरोपी) कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल त्यांच्यावर कारवाई होत आहे. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही. यासंदर्भात नीट चौकशी करू द्यावी. सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कोणालाही सोडणार नाही. याचा उपयोग राजकारणाकरता करू नये, ही अतिशय गंभीर बाब आहे," असं उत्तर दिलं. "हत्येचा उपयोग राजकारणाकरता होऊ नये तर त्याच्यातून समाजात काही सुधारणा व्हावी," अशी इच्छाही फडणवीसांनी बोलून दाखवली.

भाजपा सदस्य नोंदणीचं टार्गेट

भाजपा सदस्य नोंदणीसंदर्भात बोलताना फडणवीसांनी, "देशात सदस्यता नोंदणी अगोदरच सुरू झाली आहे, महाराष्ट्रात आजपासून सुरू झाली. मी स्वतः नागपूर महानगरात सुरुवात केली आहे. 25 सदस्य नोंदणी मी केली आहे. शहरात प्रत्येक बुथवर नोंदणी सुरु झाली. सायंकाळपर्यंत 1 लाख सदस्य नोंदणीच आम्ही लक्ष्य ठेवले आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दीड कोटीचे लक्ष ठेवले ते पूर्ण होईल," असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना, "25000 लोकांना पहिल्या दोन तासात सदस्य बनवले असून नागपूर शहरात 7 लाख सदस्य" असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. 

नक्की वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

मराठी अभिजात भाषा जीआर निघाला नाही, याबद्दल फडणवीसांना प्रश्न

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला मात्र जीआर निघाला नाही, अशी टीका ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केल्यानंतर याला अनुसरुन प्रश्न विचारला असता फडणवीसांनी, "अनेकवेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलत असतात, सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण केल्यात. हा दर्जा केंद्र सरकार देत असते," असं सांगितलं.