हे आहेत 'टेरिबल मराठी टेल्स'च्या पोस्टमागचे खरे चेहरे

जाणून घ्या कशी झाली या पेजची सुरुवात.... 

Updated: May 27, 2019, 11:05 AM IST
हे आहेत 'टेरिबल मराठी टेल्स'च्या पोस्टमागचे खरे चेहरे  title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 'विजय सिर्फ मेरा होगा...', हे असं म्हणणारी एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. बघता बघता हे प्रकरण असं काही चर्चेत आलं, की फेसबुक आणि इन्स्टाग्राम वॉलवर दर तिसऱ्या पोस्टमागे ही एक पोस्ट दिसू लागली. नीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं या प्रकरणाची ओळख आहे  हे सारंकाही ओळखलं जात आहे ते म्हणजे 'टेरिबल मराठी टेल्स' या नावाने. 

मुळात याआधी अशा 'टेल्स' (सोशल मीडिया पोस्ट) वगैरे ऐकल्या, वाचल्या आणि शेअरही केल्या होत्या. पण, हे मराठी टेल्सचं 'टेरिबल' प्रकरण जरा जास्तच खास होतं. म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा मेळ साधत, रोजच्या आयुष्यातीलच काही उदाहरणं घेत शब्दांची अशी काही अफलातून जुळवाजुळव करत सादर करण्यात आली, जे पाहता 'अरेच्छा....' हे असंही होतं की, असाच उत्स्फूर्त प्रतिसाद अनेकांनी दिला. 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकिकडे पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होणार हे साऱ्या देशातला ठाऊक झालं. किंबहुना याच देशाने त्यांना पुन्हा या पदावर येण्याची संधी दिली. त्यांचा हाच 'विजय' टेरिबल मराठी टेल्सच्या मित्रांनी 'विजय सिर्फ मेरा होगा....' या अगदी सोप्या पण, तितक्याच सर्वांशी अगदी सहजपणे जोडल्या जाणाऱ्या ओळींतून साजरा केला. बरं तोही कोणत्याही आकडेवारी आणि विश्लेषणाशिवाय. ही कलाच म्हणावी. म्हणजे कोणत्याही छायाचित्राशिवाय आणि कोणत्याही अतिरंजितपणाशिवाय अवघ्या दोन ओळींच्या बळावर खुप काही सांगण्याची ही कला.  हजारोंच्या संख्येवर लाईक्स आणि शेअर मिळवणाऱ्या, सेलिब्रिटींनाही भुरळ पाडणाऱ्या या पेजवर ही किमया करणारे चेहरे कोण असा प्रश्न पडला आहे का तुम्हाला कधी? अर्थात पडलाही असेल तेव्हा तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत याच 'टेरिबल' विचारांच्या मंडळींना.

महाराष्ट्रीयन मीम्स याच पेजपासून प्रेरणा घेत निलेश शिंदे,  नचिकेत चौधरी, प्रतिक पटेल, सुयोग सावंत आणि ऋषिकेश फाळके या पाच जणांनी या पेजची सुरुवात केली. या पाच जणांपैकी दोघंजण विद्यार्थी असून इतर आपआपल्या क्षेत्रात कार्यरत आहेतच. टेरिबल मराठी टेल्स, हा त्यांच्या आवडीचा भाग. सोशल मीडिच्याच माध्यमातून एकत्र आलेल्या याच मंडळींनी आज मात्र त्यांच्या कलात्मकतेने अनेकांचं लक्ष वेधलं ाहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

'महाराष्ट्रीयन मीम्स' या पेज चालवणाऱ्या काहीजणांशी चर्चा करुन 'नावारुपास आलं 'टेरिबल मराठी टेल्स'. 'टेरिबली टायनी टेल्स'च्याच धर्तीवर काहीतरी सुरू करण्याची आम्ही कल्पना होती, असं सांगत सुरुवात केली त्यावेळी आपल्याला अपय़शाचाच सामना करावा लागला होता, असं प्रतिक पटेल याने 'झी २४ तास'ला दिलेल्या माहितीत सांगितलं. 'सुरुवातीला आम्ही मराठीतूनच पोस्ट लिहायचो. त्यावेळी या पोस्ट फार चर्चेत आल्या नाहीत. पण, पुढे जाऊन काही महिन्यांनी आम्ही चुकांवर काम केलं आणि त्याच पोस्टना प्रतिसाद येण्यास सुरुवात झाली', असंही तो म्हणाला.  

मराठी भाषा आणि त्याच वापरल्या जाणाऱ्या शब्दरचनेच्या मदतीने अनेकांच्या त्यांच्या बालपणापासून ते अगदी तरुणाईच्या दिवसांपर्यंत जोडणाऱ्या या पेजला पाहता पाहता जवळपास अडीच महिन्यांमध्येच हजारो फॉलोअर्स मिळाले. हीच लोकप्रियता लक्षात घेत मग मराठी स्लँग किंवा बोलीभाषेतील विनोद, म्हणी यांचा वापर करत या पोस्ट अगदी सहजपणे प्रत्येकापर्यंत कशा पोहोतील यावरच भर दिल्याचंही प्रकिने सांगितलं. 

अतिरंजितपणा टाळत अगदी सोप्या आणि तितक्याच दर्शनीय अशा स्वरुपात त्यांनी या पोस्ट तयार करण्यास आणि त्या सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली. ही सारी वाटचाल एकमेकांच्या सहकार्यानेच पार पडल्याचं प्रतिकने न विसरता सांगितलं. क्रिएटिव्ह डिक्शनरी म्हणू नका किंरा मग टीएमटी नॉस्टालजिया म्हणू नका, बालपणीच्या काही आठवणींचा आधार घेत त्या धर्तीवर पोस्ट तयार करण्याला यात प्राधान्य देण्यात आलं. सर्वसामान्यांच्या मनोरंजनाच्या हेतूने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणारं हे पेज आणि त्याला मिळणारी लोकप्रियता यामागे सोशल मीडियाच्याच माध्यमातून जोडल्या गेलेल्या पाच जणांचा हात आहे. मुळात दैनंदिन आयुष्यातील घटनांचाच आधार घेत मैत्री, नाती, भावना अशा असंख्य गोष्टी 'टेरिबल मराठी टेल्स'च्या या शिलेदारांनी घराघरात आणि प्रत्येकाच्या मोबाईलमधील गॅलरीपर्यंत पोहोचवल्या आहेत. आहे की नाही हे 'टेरिबली युनिक?'